नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकाची (T20 World Cup 2022) सुरूवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या अभियानात भारतीय संघ आपला पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध खेळेल. या बहुचर्चित सामन्यासाठी सर्व तिकिटांची विक्री झाली आहे. भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी देश-विदेशातील सेलिब्रिटी ऑस्ट्रेलियाला पोहोचणार आहेत, मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा हे हा सामना पाहण्यासाठी जाणार नाहीत. नुकतेच रमीझ राजा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, राजा यांनी म्हटले की, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी ते उत्सुक नसतात असे नाही. पण सामन्यादरम्यान ते इतर लोकांशी भांडतात, यामुळे ते यावेळी घरूनच सामना पाहणार आहेत. पाकिस्तानी वृत्तवाहिनी समा टीव्हीशी संवाद साधताना राजा यांनी सांगितले, "मी पाकिस्तानचा पहिला सामना पाहण्यासाठी यासाठी जाणार नाही कारण माझ्याकडे सामना पाहण्यासाठी तसा स्वभाव नाही आहे. मी खूप भावनिक आहे आणि म्हणूनच मी सामना पाहायला जात नाही कारण मी तिथल्या लोकांशी भांडतो. अनेकांनी मला विश्वचषकाचा पहिला सामना पाहण्यास सांगितले पण मी नकार दिला. मी घरी बसून सामना पाहणार आहे."
पाकिस्तानची मधली फळी हा चिंतेचा विषय - राजा पाकिस्तानी संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजीवर भाष्य करताना राजा यांनी म्हटले, "हा नक्कीच चिंतेचा विषय आहे, मात्र यावर मार्ग काढला जाऊ शकत नाही असे नाही." याशिवाय त्यांनी पाकिस्तानचा संघ विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीत असल्याचे त्यांनी म्हटले. "मला माहिती आहे पाकिस्तानच्या मधल्या फळीतील फलंदाजीवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. मधल्या फळीतील फलंदाजीवर मार्ग काढणे गरजेचे आहे. उर्वरित संघांप्रमाणेच पाकिस्तानलाही विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी जात आहे उपविजेता बनण्यासाठी नाही", असे रमीझ राजा यांनी अधिक म्हटले.