नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (PCB) रमीझ राजा सध्या खूप चर्चेत आहेत. ते बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या वादावर दिवसेंदिवस वेगवेगळी विधानं करत आहेत. जर भारतीय संघ आगामी आशिया चषकासाठी पाकिस्तानात आला नाही तर पाकिस्तानी संघ देखील भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकेल अशी धमकी राजा यांनी दिली होती. यानंतर त्यांनी मवाळ भूमिका घेत भारत आणि पाकिस्तान यांची कसोटी क्रिकेटला गरज असल्याचे म्हटले होते.
खरं तर ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याशिवाय आशिया चषकाची स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवावी अशी मागणी देखील त्यांनी केली. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लांबलचक पत्रक काढून बीसीसीआयवर टीका केली होती. अशातच आता आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण बदलल्यास पीसीबी विरोध करेल, असे राजा म्हणत आहेत.
...तर आम्ही विरोध करणारच पीसीबी अध्यक्ष राजा यांनी पुन्हा एकदा बीसीसीआयला इशारा दिला आहे. "मला वाटते की हे सरकारचे धोरण आहे आणि ते येतील की नाही हे मला माहीत नाही. आशिया चषक हा चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर आशिया चषक पाकिस्तान होत नसेल तर आम्ही जरूर विरोध करू. आम्हाला जाऊन (वन डे विश्वचषकासाठी भारतात) खेळायचे आहे. आमच्या खेळाडूंचे भारतातही चाहते आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की सर्वकाही समान अटींवर असावे. तुम्ही कोणत्याही क्रिकेट बोर्डाच्या दबावाखाली राहू शकत नाही. भारताशिवायही आम्ही काही वर्षे क्रिकेट खेळत आहोत." अशा शब्दांत रमीझ राजा यांनी आयसीसी बीसीसीआयच्या दबावाखाली असल्याचे म्हटले आहे.
2023 मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा
- - आयसीसी महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका
- - आयसीसी 19 वर्षांखालील मुलींची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका
- - आशिया चषक 2023, पाकिस्तान
- - आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"