कराची : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) ने शनिवारी त्यांच्या एका हॉटेलमध्ये लावलेला पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खानचा फोटो झाकला होता. तसेच पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रसारण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( पीसीबी) नाराजी व्यक्त केली. IMG रियायन्सनेही पाकिस्तान सुपर लीगचे भारतातील प्रसारण करण्यास नकार दिला. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या आणि 40 जवान शहीद झाले.''पाकिस्तान सुपर लीगशी कोणत्याही प्रकारचे संबध ठेवण्यात इच्छुक नसल्याचे आम्हाला IMG रियायन्सने कळवले. आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध आहे आणि सोमवारी त्याची घोषणा होईल, असे पीसीबीचे व्यवस्थापकीय संचालक वासिम खान यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,''खेळ आणि राजकारण यांना वेगळे ठेवण्याची आवश्यकता आहे. क्रिकेटने या दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी नेहमी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.''
''भारतीय क्रिकेट चाहत्यांना पाकिस्तान सुपर लीगचे सामने पाहण्यापासून रोखणं, हे दुर्दैवी आहे. त्याशिवाय पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांचा क्रिकेट क्लब ऑफ इंडियामधील फोटो झाकणं, हेही अत्यंत खेदजनक आहे. या महिन्याअखेरीस दुबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत या प्रकरणाची तक्रार बीसीसीआय आणि आयसीसीकडे करणार आहोत,'' असे खान यांनी सांगितले.पुलवामा हल्ला झाल्यानंतर क्लबने एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी ब्रेबॉर्न स्टेडिअममधील मुख्यालयातील या हॉटेलमधील इम्रान खानचा वॉलपेपर झाकण्याचा निर्णय घेतला. सीसीआई हा बीसीसीआयचा मान्यताप्राप्त क्लब आहे. सीसीआयच्या या हॉटेलमध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या बाजुलाच इम्रान खान यांचा वॉलपेपर लावलेला होता. तो झाकण्यात आला आहे.