PCB Controversy:पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील नाट्यमय घडामोडी थांबताना दिसत नाहीत... फिक्सिंगमुळे वादात सापडलेल्या सलमान बटला निवड समितीत जागा मिळाली अन् पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली. चाहत्यांसह माजी खेळाडूंनी रोष व्यक्त करताच निवड समितीचा प्रमुख वहाब रियाजला तातडीने पत्रकार परिषद घ्यावी लागली. रियाजने शनिवारी पत्रकार परिषद घेत सलमान बटला निवड समितीतून बरखास्त करत असल्याचे जाहीर केले. तसेच त्याने काही पत्रकारांवरही रोष व्यक्त केला आणि कराचीतील काही क्रीडा पत्रकारांना यामुळे आनंद झाला असेल, असे म्हटले.
पीसाबीवर झालेल्या टीकेवर वहाब रिहाजने भारतातील काही क्रिकेटपटूंचा दाखला दिला. क्रिकेट विश्वात अशा अनेक घडामोडी झाल्या आहेत. पण या क्रिकेटपटूंना पुन्हा संधी देण्यात आली. भारताकडे मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजा यांचे उदाहरण आहे. ते आता क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. अझरुद्दीन हा एका क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे आणि जडेजा विश्वचषकात अफगाणिस्तानचा फलंदाजी सल्लागार होता. अशी सूचक प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. सलमान बटला कामरान अकलम आणि इफ्तिखार अंजुमसह पीसीबीने निवड समितीच्या सल्लागात सदस्यांमध्ये नियुक्त केले होते. पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि तिथे कसोटी मालिका खेळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान निवड समितीमध्ये बटचा समावेश करण्यात आला. परंतु पीसीबीच्या या निर्णयाचा पाकिस्तानातील क्रिकेट प्रेमींकडून कडाडून निषेध नोंदवण्यात आल्याने सलमान बटची एका दिवसात हकालपट्टी करण्यात आली.