लाहोर : इंडियन प्रीमिअर लीगनं ( IPL) आपल्या भव्यदिव्य स्वरुपानं अन् त्यात पडणाऱ्या पैशांच्या पावसानं जगाचे लक्ष वेधले. त्यामुळे आताच्या घडीला जगाच्या कानाकोपऱ्यात ट्वेंटी-20 लीगचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. यात मग शेजारील राष्ट्र पाकिस्तान कसे मागे राहतील. त्यांनी आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान सुपर लीगची स्थापना केली. पण, प्रेक्षक सोडा या लीगला आर्थिक गोळाबेरीजही जमलेली नाही. पाकिस्तान सुपर लीगच्या पहिल्या दोन हंगामात पाकिस्तान क्रिकेट मंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.
पीएसएलच्या पहिल्या दोन हंगामाचा लेखापरिक्षण अहवाल अर्थात ऑडीट रिपोर्ट समोर आला. फ्रँचायझींकडून पगार देण्यात होणार विलंब, पुरवठादारांची थकलेली बिलं आदींमुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला तोटा सहन करावा लागला आहे. या अहवालानुसार पाकिस्तान क्रिकेट मंडळाला जवळपास 248.615 कोटींचा फटका बसला आहे. हा अहवाल पाकिस्तानच्या सभागृहात सादर करण्यात आला. त्यात पाकिस्तान बोर्डाला पुरस्काराच्या रकमेतून मिळणाऱ्या भरपाईपोटी 54.490 कोटींचा तोटा सहन करावा लागला.
2016मध्ये या लीगची सुरुवात झाली. सहा संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये सर्वाधिक 2 जेतेपदं ही इस्लामाबाद युनायटेडच्या नावावर आहेत. कामरान अकमल ( 1286) हा सर्वाधिक धावा करणारा, तर वाहह रियाझ ( 65) हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.