पाकिस्तानी संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियावर १० विकेट्स राखून विजय मिळवला. वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांचा १२ पराभवानंतर टीम इंडियाविरुद्धचा हा पहिलाच विजय ठरला. आता या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( BCC) टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. PCBचे अध्यक्ष रमीझ राजा ( Ramiz Raja) यांनी महिला क्रिकेटपटूंसाठी आशियातील पहिली ट्वेंटी-२० फ्रँचायझी लीग खेळवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. बीसीसीआयला अद्याप महिला आयपीएल खेळवता आलेली नाही. त्यात पीसीबीनं असं करून दाखवलं तर ते आशियातील पहिलेच क्रिकेट बोर्ड ठरतील.
''महिलांची पाकिस्तान सुपर लीग खेळवण्याचा विचार डोक्यात सुरू आहे. आशा करतो की आशियात अशी महिलांसाठीची फ्रँचायझी लीग खेळवण्याचा पहिला मान आमच्या बोर्डाला मिळेल,''असे रमीझ राजा यांनी सांगितले. आतापर्यंत ऑस्ट्रेलियात महिलांची बिग बॅश लीग खेळवली जातेय, इंग्लंडनं नुकतीच दी हंड्रेड महिला लीग खेळवली होती. भारतानंही महिलांची ट्वेंटी-२० चॅलेंज लीग खेळवलीय, परंतु त्यात केवळ तीनच संघ खेळत आहेत.