Join us  

रोहित शर्माच्या टीकाकारांना जून्या मित्राकडून सडेतोड उत्तर; सुनील गावस्करांवर निशाणा?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 5:27 PM

Open in App

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील लाजीरवाण्या पराभवानंतर महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी जोरदार टीका केली. पण, हिटमॅनच्या मदतीला माजी सहकारी अन् मित्र हरभजन सिंग ( Harbhajan Singh) धावून आला आहे. भज्जीने रोहित शर्मासोबत भारतीय तसेच मुंबई इंडियन्सनचे ड्रेसिंग रुमही शेअर केले आहे. त्यामुळे त्याने रोहितचे भरभरून कौतुक केले आहे.  

“मला असे वाटते की लोक थोडे जास्तच रोहितवर टीका करत आहेत. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि एक व्यक्ती तुम्हाला एका ठिकाणाहून दुसरीकडे नेऊ शकत नाही,” असे हरभजनने PTIला दिलेल्या  मुलाखतीत म्हटले आहे.  तो पुढे म्हणाला, भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. तुम्ही त्या सामन्यातील कामगिरीवर नक्की बोला आणि तिथून पुढे व्हा, परंतु एकट्या रोहितवर टीका करत राहणं चुकीचं आहे. धावा न करणारा तो एकटाच नाही. माझ्यामते तो उत्कृष्ट कर्णधार आहे.'' 

“मी त्याच्यासोबत खेळलो आहे आणि त्याला जवळून पाहिले आहे. तो केवळ MI ड्रेसिंग रूममध्येच नाही तर भारतीय ड्रेसिंग रूममध्येही त्याला खूप आदर मिळतो. त्यामुळे अलीकडील निकालांच्या आधारे त्याला जज करणे अयोग्य आहे. तो चांगला निकाल देईल आणि आपण त्याच्यावर विश्वास दाखवला पाहिजे. त्याच्याकडे बोट दाखवण्या ऐवजी आपल्याला त्याचे समर्थन करणे आवश्यक आहे,''असेही भज्जी म्हणाला.  

तो म्हणाला, “तुम्हाला बीसीसीआयचा पाठिंबा असेल तर तुम्ही मोकळेपणाने काम करू शकता. फक्त महेंद्रसिंग धोनी किंवा विराट कोहलीच नाही, थोडं मागे गेलं तर त्यावेळी   अनेक कर्णधारांना बीसीसीआयचा पाठिंबा मिळाला आहे. रोहितला BCCIकडून पाठिंबा मिळत असावा. मला माहित नाही की त्याला किती पाठिंबा मिळत असेल. अशा प्रकारचे समर्थन त्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. त्याला पाठिंबा असेल तर त्याला ते स्वातंत्र्य मिळेल.”  

टॅग्स :रोहित शर्माहरभजन सिंगसुनील गावसकरबीसीसीआय
Open in App