मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे नेहमी चर्चेत राहणारे कपल आहेत. त्यामुळे ते कोठेही एकत्र दिसले की त्यांच्यावर चर्चा होतेच. पण, अनेकदा विराटची पत्नी म्हणून अनुष्काला मिळत असलेल्या रॉयल ट्रिटमेंटमुळे टीकाही झाली. त्यामुळे विराटने अनेकदा नाराजीही प्रकट केली. पण, त्याने क्रिकेटवरील त्याचे लक्ष कधीच विचलित होऊ दिले नाही. त्यामुळेच गेली दहा वर्ष त्याने क्रिकेट चाहत्यांना निखळ आनंद दिला आहे. पण, हे चाहते आम्हाला समजून घेत नाहीत, असा दावा विराटने केला आहे.
इंग्लंड दौऱ्यावर असताना एका प्रसिद्ध इंग्रजी मासिकाने विराटची मुलाखत मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात विराटने दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. तो म्हणाला,'' लोकांना असे वाटते की आम्ही दंतकथेतील आयुष्य जगतो, परंतु येथे केवळ स्टँडर्डचा फरक आहे. आम्हीही सामान्य माणसांसारखेच आहोत. अनुष्का आणि मी एकमेकांना चांगले समजतो. आम्ही एकसारख्या परिस्थितीतूनच इथवर पोहोचलो आहोत. सेलेब्रिटी असल्यामुळे लोकांच्या नजरा आमच्यावर नेहमी खिळलेल्या असतात. परंतु, घरात आम्ही सामान्य आयुष्य जगतो.''
इंग्लंड दौऱ्यानंतर विराटला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. क्रिकेट व्यतिरिक्त आयुष्याचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही काय करता, या प्रश्नावर विराट म्हणाला,''परदेश दौऱ्यावर असताना क्रिकेट वेळापत्रकात विश्रांती असेल तर भ्रमंती करणे आम्हाला आवडते. शॉपिंग करतो, रस्तांवर फिरतो... भारतात अस आम्हाला करता येत नाही. तेथे गाडीतूनच फिरणे होते. आम्हाला पाळीव कुत्रे आवडतात आणि त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही खेळतो.''