नवी दिल्ली : ‘मी कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. एक वेळ अशीही होती, की माझ्या विचित्र गोलंदाजीच्या शैलीमुळे लोकांना वाटत होते, की मी भारताकडून खेळू शकणार नाही,’ अशी प्रतिक्रिया भारताचा हुकमी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दिली. माजी अष्टपैलू युवराज सिंगसोबत इन्स्टाग्रामवर झालेल्या चर्चासत्रादरम्यान बुमराहने ही माहिती दिली.
यावेळी युवराजने बुमराहला गोलंदाजी शैलीबाबत विचारले. तेव्हा बुमराह म्हणाला की, ‘अनेकांनी मला सांगितले होते की, मी दीर्घकाळ खेळू शकणार नाही. लोकांना वाटत होते की, देशाकडून खेळणारा कोणी अखेरचा व्यक्ती असेल, तर तो बुमराहच असेल. मी केवळ रणजी ट्रॉफीपर्यंतच मजल मारेन असे लोक सांगायचे. पण मी माझ्या कामगिरीमध्ये सुधारणा करत राहिलो आणि कायम माझ्या शैलीवर ठाम राहिलो.’
बुमराहने सर्वप्रथम आयपीएलमध्ये आपली छाप पाडली. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने जानेवारी २०१६ मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावेळी बुमराहने आपल्या विशिष्ट शैलीसाठी मिळालेल्या प्रेरणेबाबतही सांगितले. त्याने म्हटले की, ‘मी गोलंदाजीसाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. मी जे काही शिकलो ते टीव्हीवर पाहूनच शिकलो. त्यावेळी मी एका टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या गोलंदाजाच्या शैलीची नकल करायचो. पण हीच शैली नंतर माझी ओळख कशी बनली हे कळले नाही. १९ वर्षांखालील क्रिकेटपर्यंत माझी शैली वेगळी होती. यानंतर यामध्ये बदल होत राहिले आणि जेव्हा आताची शैली वापरू लागलो, तर कोणीही यामध्ये बदल न करण्याबाबत सांगितले आणि मीही यावर अधिक काम करू लागलो.’ (वृत्तसंस्था)
>युवीची
भविष्यवाणी ठरली खरी!
या बातचीतदरम्यान युवराजने स्वत: केलेल्या भविष्यवाणीची आठवणही करून दिली. बुमराहविषयी युवराजने म्हटले होते की, एक दिवस हा गोलंदाज जागतिक क्रमवारीतील अव्वल गोलंदाज बनेल. युवराजची ही भविष्यवाणी बुमराहने २०१७ मध्ये खरी ठरवली होती. त्यावेळी बुमराह टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल गोलंदाज ठरला होता.
>‘प्रत्येक कसोटी सामना महत्त्वाचा’
जानेवारी २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर या प्रकारातही बुमराह टीम इंडियाचा भरवशाचा गोलंदाज बनला. याबाबत बुमराह म्हणाला की, ‘मी कसोटी क्रिकेटला खूप महत्त्व देतो. कारण यामध्ये प्रत्येक बळींसाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि हे समाधानकारक असते. माझ्यासाठी प्रत्येक कसोटी सामना महत्त्वपूर्ण आहे. मी अजूनपर्यंत भारतात कसोटी सामना खेळलेलो नाही, पण मी यासाठी प्रतीक्षेत आहे.’
Web Title: People had no idea he would play for India - Jaspreet Bumrah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.