- हर्षा भोगले
आयपीएलमध्ये यॉर्कर निर्णायक भूमिका वठवित असल्याचे पाहून आनंद झाला. गोलंदाजीत वाढलेल्या अडचणी पाहून मी थोडा चिंताग्रस्त होतो. फलंदाजीत सतत सुधारणा होत असताना नव्या प्रकारच्या बॅटमुळे गोलंदाजांच्या अडचणीत मात्र भर पडत आहे.
गोलंदाज यॉर्कर टाकताना का घाबरतात, हे समजू शकतो. परफेक्ट यॉर्करसाठी किती मेहनत घ्यावी लागते, हे अचूक यॉर्कर टाकणारे सांगू शकतील. काही इंच लांब चेंडू टाकला की तुमचा चेंडू सीमारेषेबाहेर गेला असे समजा. एक वेळ अशी होती की त्यावेळी ‘फुलटॉस’ला चांगला चेंडू मानले जायचे. पण काळाच्या ओघात अशा चेंडूवर चौकार - षटकार मारले जाऊ लागले. यॉर्कर टाकताना थोडा लहान टप्पा टाकल्यास प्रत्येक फलंदाज त्यावर ‘स्कूप’ किंवा ‘रिव्हर्स स्विप’ असे शॉट मारणे पसंत करतो. हे दोन्ही शॉट धोकादायक असले तरी सध्या लोकप्रिय झाले आहेत.
परफेक्ट यॉर्कर टाकणे हे परफेक्ट कॉफी किंवा चॉकलेट बनविण्याइतकेच कठीण आहे. गेल्या काही दिवसात दोन शानदार गोलंदाजांनी असे परफेक्ट यॉर्कर टाकले आहेत. विशेष म्हणजे या चेंडूंमुळेच सामन्याचे संपूृण चित्र पालटले. हैदराबादमध्ये रॉयल चँलेंजर्स बँगलोरविरुद्ध वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल याने १९ व्या षटकात चांगला मारा केला. अखेरचे षटक भुवनेश्वर कुमारचे होते. सामना वाचविण्यासाठी १२ पेक्षा कमी धावा द्यायचे आव्हान होते. याआधीही रॉयल चँलेंजर्स बँगलोरसाठी मॅचफिनिशर ठरलेले कॉलिन ग्रॅन्डहोम आणि मनदीपसिंग हे खेळपट्टीवर होते. पण भवनेश्वरने एकाच षटकांत चार यॉर्कर टाकले. त्या षटकांत केवळ सहा धावा निघाल्या आणि सनरायझर्स हैदराबादने शानदार विजय मिळवला. हे पाहणे आश्चर्यापेक्षा कमी नव्हते.
किंग्स इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध जोफरा आर्चर याने परफेक्ट गोलंदाजी करीत राजस्थान रॉयल्स संघाला शानदार विजय मिळवून दिला. या षटकांतही चार निर्णायक यॉर्कर पहायला मिळाले. खेळपट्टीवर दोन स्थिरावलेले फलंदाज असताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागला, असेच हे यॉर्कर होते. आता आगामी काही सामन्यातही असेच निर्णायक यॉर्कर चेंडू पाहण्याची मला प्रतीक्षा आहे. (टीसीएम)
Web Title: 'Perfect Yorker' in the IPL is an unforgettable experience
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.