सुनील गावसकर, स्ट्रेट ड्राईव्ह
पंजाबला सहजपणे नमवल्यानंतर बँगलोरचा संघ आता हैदराबादला नमवून गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांमध्ये येण्यास प्रयत्नशील आहे. असे झाल्यास, अखेरचा साखळी सामना होण्यापूर्वीच बँगलोर चेन्नईला गाठतील. बँगलोरचा अखेरचा साखळी सामना अव्वल स्थानावरील दिल्लीविरुद्ध होणार असून हा सामना अंतिम सामन्याची रंगीत तालिमही ठरू शकतो. ग्लेन मॅक्सवेलची निवड करणे बँगलोरसाठी जास्त फायदेशीर ठरले आणि त्याने जबरदस्त खेळीद्वारे आपली निवड सार्थही ठरवली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना आणि कोणत्याही अपेक्षांविना खेळताना त्याने आपली सर्वोत्तम खेळी केली. खूप मोठ्या कालावधीनंतर मॅक्सवेलला इतके आनंदी आणि हसताना पाहिले. जेव्हा तो अशाप्रकारे खेळतो, तेव्हा प्रतिस्पर्धी संघाच्या पाठिराख्यांचे चेहरेही आनंदी होतात. विराट कोहली डावाची अपेक्षित सुरुवात करून देत आहे. शिवाय पंजाबविरुद्ध एबी डीव्हिलियर्सही आक्रमक खेळताना दिसला, त्यामुळे आता बँगलोरची फलंदाजी अधिक धोकादायक दिसत आहे.
बँगलोरने मधल्या षटकांमध्ये युझवेंद्र चहलच्या जादुई फिरकीचा चांगल्याप्रकारे वापर केला आहे. हे त्यांनी यंदा खूप चांगले केले. यादरम्यान प्रतिस्पर्धी फलंदाज पूर्णपणे गोंधळलेले दिसले. जेव्हा एखादा खेळाडू इतक्या शानदारपणे लेग स्पिन गोलंदाजी करतो, तेव्हा आश्चर्य वाटते की, त्याला भारतीय संघातून बाहेर कसे ठेवले जाते. त्याचवेळी, भारतीय संघात समावेश करण्यात आलेल्या रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन आणि वरुण चक्रवर्ती यांनीही यंदा संथ खेळपट्टीवर चांगले प्रदर्शन केले आहे. भारतासाठी चिंताजनक आहे ते वेगवान गोलंदाजांकडून झालेली साधारण कामगिरी. त्यात जर हार्दिक पांड्या स्पर्धेच्याआधी गोलंदाजी करणार नसेल, तर संघाचे संतुलन राखण्यात संघर्ष करावा लागेल. हैदराबाद मैदानात आपल्या खेळाचा आनंद घेत काही खळबळजनक निकाल लावतील, अशी अपेक्षा होती.
मात्र, या संघाला अद्यापही मोकळेपणे खेळण्यास अडचणी येत असून यामुळे हा संघ सर्वात तळाला राहिला आहे. तुफानी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत या संघाचे हात जणू बांधले गेले आहेत. उमरान मलिक नक्कीच वेगवान गोलंदाज आहे, पण तो युवा असून प्रतिस्पर्धी फलंदाजांना उद्ध्वस्त करण्यास त्याला वेळ लागेल. हैदराबादच्या युवा खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेला न्याय दिला नाही. १९ वर्षांखालील संघाच्या स्तरावर खेळणे वेगळे असते आणि आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेतील कामगिरीचा स्तर वेगळा असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कमी खेळाडू यशस्वी ठरतात. बँगलोरचा कर्णधार विराट कोहली याचे ताजे उदाहरण आहे, पण इतर खेळाडू या स्तरावर यशस्वी होण्यात संघर्ष करताना दिसतात. या स्पर्धेचा अर्थच आहे की, येथे गुणवत्तेला संधी मिळते. पण हैदराबाद संघाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, या संघात संधीची कोणतीही कमी नाही, पण पुरेशी गुणवत्ता नाही.