Join us  

विराटविना कामगिरी खालावेल; भारतीय कर्णधाराच्या पितृत्व रजेचा ऑस्ट्रेलिया संघाला पूर्ण सन्मान

भारतीय कर्णधाराच्या पितृत्व रजेचा ऑस्ट्रेलिया संघाला पूर्ण सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 1:23 AM

Open in App

मेलबोर्न : विराट कोहली पितृत्व रजेवर जाणार असल्याचा ऑस्ट्रेलियाला पूर्ण सन्मान आहे, त्याचवेळी त्याच्या अनुपस्थितीचा फटका बॉर्डर- गावसकर चषकासाठी खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला बसेल, असा इशारा ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य कोच जस्टिन लॅंगर यांनी शुक्रवारी दिला. ॲडिलेडच्या पहिल्या कसोटीनंतर कोहली मायदेशी परत येणार आहे. बीसीसीआयने त्याला पितृत्व रजा बहाल केली. जानेवारीत त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असून यावेळी तो पत्नीसोबत राहू इच्छितो.

‘कोहलीच्या क्रिकेटच्या तुलनेत कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या निर्णयाचा आम्ही पूर्ण सन्मान करतो. मी आयुष्यात आतापर्यंत जितके खेळाडू पाहिले त्यात शक्यतो विराट मला सर्वोत्कृष्ट वाटतो. यामागे अनेक कारणे आहेत. केवळ त्याच्या फलंदाजीमुळे प्रभावित होऊन मी हे वक्तव्य करीत नाही. त्याच्यातील ऊर्जा, खेळाप्रति समर्पित वृत्ती आणि क्षेत्ररक्षण या बळावर तो सर्वोत्तम ठरतो,’ असे लॅंगर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा बोलताना सांगितले. 

ते म्हणाले, ‘विराट जे करतो, त्यात शंकर टक्के ऊर्जेसह स्वत:ला झोकून देतो. या अविश्वसनीय कामासाठी त्याचा मोठा सन्मान आहे. बाळाच्या जन्मासाठी मायदेशात परतण्याचा त्याचा निर्णय सन्माननीय आहे. विराटदेखील आमच्यासारखाच माणूस आहे. मला आपल्या कुठल्याही खेळाडूला सल्ला द्यायचा झाल्यास मी इतकेच सांगेन की बाळाच्या जन्माच्यावेळी पत्नीसोबत राहा. आयुष्यातील हे सर्वांत मोठे काम असेल.’

कोहली हा मेलबोर्न, सिडनी आणि ब्रिस्बेन येथे २६ डिसेंबर ते १९ जानेवारी या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या पुढील तिन्ही कसोटी सामन्यात खेळणार नाही. कोहलीची अनुपस्थिती भारताला परवडणारी नसेल. तरीही ऑस्ट्रेलिया संघाने गाफील राहू नये. कुठलाही शिथिलपणा अंगलट येऊ शकतो. कोहलीच्या अनुपस्थितीचा यजमान संघाने लाभ घ्यावा मात्र मागच्या दौैऱ्यात काय झाले विसरू नये. भारताचा संघ तगडा आहे. विराटचे असणे किंवा नसणे याला महत्त्व नाही. एका सेकंदासाठीही आत्मसंतुष्ट राहू नका,’ या शब्दात लँगर यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सावध केले.

शानदार फॉर्ममध्ये असलेला युवा फलंदाज विल पुकोवस्की याला भारताविरुद्ध कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नरचा सहकारी म्हणून संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. चार सामन्यांच्या मालिकेत ज्यो बर्न्स हा सलामीवीराची भूमिका बजावेल, असे संकेत ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टिन लॅंगर यांनी दिले आहेत. 

nमागच्या उन्हाळ्यात बर्न्सने देशासाठी ३२ च्या सरासरीने धावा केल्या. तथापि शेफिल्ड शील्डमध्ये सुरुवातीच्या सामन्यात तो केवळ ५७ धावा करण्यात यशस्वी ठरला. दुसरीकडे २२ वर्षांचा पुकोवस्की याने सलग दोन द्विशतके झळकवली. प. ऑस्ट्रेलियाकडून त्याने २०२ आणि द. ऑस्ट्रेलियाकडून २५५ धावा ठोकल्या. लँगर म्हणाले, ‘पुकोवस्की चांगली कामगिरी करीत असल्याने तो पहिली कसोटी खेळू शकतो, मात्र सलामीवीराच्या भूमिकेबाबत विचार करावा लागेल.

मागच्यावर्षी वॉर्नर-बर्न्स ही जोडी प्रभावी ठरली होती. दोघांमध्ये योग्य ताळमेळ आहे. याच आधारे मी ही जोडी कायम राखू इच्छितो. बर्न्स- वॉर्नर यांनी सलामीवीर म्हणून १,३६५ धावा केल्या आहेत.  कामगिरीच्या बळावर ही जोडी आयसीसी कसोटी रॅंकिंगमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाली. आज आम्ही ज्या स्थितीत आहोत, तिथवर घेऊन जाणाऱ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या दीर्घ यशामागील हेच कारण आहे. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया