दुबई : कोरोना व्हायरस महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर कसोटी क्रिकेट पुन्हा सुरू होण्यासाठी गोलंदाजांना अन्य खेळाडूंच्या तुलनेत अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गोलंदाजांना दुखापतीपासून बचाव करता यावा म्हणून त्यांच्यासाठी तयारीचा कालावधी दोन ते तीन महिने निश्चित केला आहे.
सदस्य देशांनी कोविड-१९ महामारी रोखण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनमध्ये थोडी सूट दिली आहे आणि आयसीसीने शुक्रवारी खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी दिशानिर्देश जाहीर केले आहेत, पण गोलंदाजांना पुनरागमनासाठी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण ते दुखापतग्रस्त होण्याची शक्यता अधिक असते.
क्रिकेटचे विश्वसंचालन करणाऱ्या संस्थेने या दिशानिर्देशांमध्ये म्हटले की, ‘कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांच्या तयारीसाठी किमान ८ ते १२ आठवड्यांच्या कालावधी आवश्यक आहे. गोलंदाज प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करीत असल्यामुळे दुखापतग्रस्त होण्याचा धोका अधिक राहील. गोलंदाजांचे सुरक्षित व प्रभावी पुनरागमन आवश्यक असेल. जर त्यांना तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही तर त्यांना अधिक दुखापती होतील.’
आयसीसीने संघांना जास्त खेळाडूंचा वापर करण्याचा सल्ला दिला असून गोलंदाजांवर येणाºया दबावाप्रति सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. त्याचसोबत कसोटी क्रिकेटच्या तयारीसाठी किमान ८ ते १२ आठवड्यांचा कालावधी आवश्यक राहील. या महामारीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्थगित आहे. या महामारीमुळे जगभरात तीन लाखांपेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. (वृत्तसंस्था)पाकिस्तान आॅगस्टमध्ये इंग्लंड दौºयावर जाणार आहे. त्यात तीन कसोटी व एवढेच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. या सामन्यांचे आयोजन रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहे.
इंग्लंडच्या १८ गोलंदाजांनी तयारीसाठी गुरुवारपासून सात कौंटी मैदानावर वैयक्तिक सरावाला सुरुवात केली.आयसीसीने म्हटले आहे की, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत गोलंदाजांना पुनरागमनाच्या तयारीसाठी किमान पाच ते सहा आठवड्यांचा कालावधी आवश्यक आहे. वन-डे च्या तयारीसाठी किमान सहा आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.