मेलबर्न - धर्मशाळा येथे आज (गुरुवार) भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळा जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच क्रिकेट प्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. गेल्या रविवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावर महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात खुद्द मेलबर्न क्रिकेट ग्राउंडने एक पत्रकही काढले आहे.
महिला टी-20 विश्वचषकाचा हा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळला गेला होता. हा सामना पाहण्यासाठी 86 हजार 174 लोक मैदानावर उपस्थित होते.
मेलबर्नमध्ये अलर्ट -मेलबर्न क्रिकेट ग्राउंडने जारी केलेल्या या पत्रकात म्हटले आहे, की जे लोक N42 स्टँडमध्ये बसले होते त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. एवढेच नाही, तर कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा, असेही या पत्रकात म्हणण्यात आले आहे. या शिवाय ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळतात, अशा 27 ठिकाणी जाऊ नये, अशी सूचनाही ऑस्ट्रेलियन सरकारने नागरिकांना केली आहे.
सामन्यावर भीतीचे सावट -भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात धर्मशाला येथे सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी हजारोच्या संख्ये लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या व्हायरसमुळे भारतात अद्याप एकही सामना रद्द झालेला नाही. मात्र खेळाडूंच्या मनात या व्हायरसची भीती आहे. भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने कोरोना व्हायरस एक गंभीर मुद्दा असल्याचे म्हटले आहे.
भुवनेश्वर म्हणाला, गुरुवारी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आम्ही कोरोना व्हायरसपासून बचावासाठी पुरेपूर काळजी घेत आहोत.
दिल्लीहून धर्मशाळाला रवाना होण्यापूर्वी युजवेंद्र चहलने तोंडावर मास्क लावले होते. हिमाचल प्रदेशातही कोरोना व्हायरसचे 3 संशयित समोर आले आहेत. या पैकी दोन कांगडा जिल्ह्यातील तर एक संशयित शिमला येथील आहे.
आयपीएलवरही भीतीचे सावट -जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलवरही कोरोना व्हायरसचे सावट दिसू लागले आहे. असेही वृत्त आहे, की इंडियन प्रिमियर लीगचे 13वे सत्र कोरोना व्हायरसमुळे रद्दही होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यावर मोठा निर्णय घेऊ शकतात. यासंदर्भात 14 मार्चला आईपीएलच्या गर्व्हनिंग काउंसिलची बौठकही होणार आहे.
बांगलादेशात होणारी मालिकाही रद्द -कोरोना व्हायरसच्या धास्तीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्ल्ड इलेव्हन आणि एशिया इलेव्हनदरम्या होणारी 2 सामन्यांची टी-20 मालिका रद्द करण्यात आली आहे. हे दोन्हीही सामने ढाका येथे होणार होते.