इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. शनिवारी त्याच्या अशाच एका वादळी खेळीची प्रचिती आली. त्यानं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला 226.82च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी खेळी केली. त्यात 8 उत्तुंग षटकारांसह 3 चौकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीच्या जोरावर पर्थ स्कॉर्चर्स संघानं 20 षटकांत 3 बाद 213 धावांचा डोंगर उभा केला. बिग बॅश लीगमधील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.
पर्थ स्कॉर्चर्स विरुद्ध ब्रिस्बने हिट यांच्यातल्या सामन्यात चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. या सामन्यात 13 षटकार व 12 चौकार लगावले गेले. जोश इंग्लिस ( 28) आणि लिएम लिव्हिंगस्टोन ( 39) यांनी पहिल्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या. इंग्लिस बाद झाल्यानंतर लिव्हिंगस्टोन व सॅम व्हाइटमन (4) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, व्हाइटमन लगेच माघारी परतला. त्यापाठोपाठ लिव्हिंगस्टोनही बाद झाला.
त्यानंतर कर्णधार मिचल मार्श आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांनी दणदणीत खेळ केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 124 धावांची भागीदारी केली. बँक्रॉफ्टनं 29 चेंडूंत 3 षटकारांसह नाबाद 41 धावा चोपल्या. पण, मार्शची खेळी भाव खाऊन गेली. त्यानं 41 चेंडूंत 3 चौकार व 8 षटकारांसह नाबाद 93 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर स्कॉर्चर्स संघानं 213 धावांचा डोंगर उभा केला.