पाकिस्तानच्या क्रिकेटसाठी ३ मार्च २००९ हा दिवस 'ब्लॅक डे' ठरला होता. लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी घटनेची मोठी किंमत पाकिस्तानला आजही चुकवावी लागत आहे. आयसीसीकडून बरीच वर्ष पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बंदी घालण्यात आली होती. बंदी उठवल्यानंतरही न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांनी पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता.
आता तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. यातच पेशावरमध्ये आज मोठा आत्मघाती हल्ला झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यात तीन कसोटी, तीन वनडे आणि एक ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. यातील पहिला सामना ४ मार्चपासून रावळपिंडी येथे खेळवला जात आहे.
पेशावरच्या मशिदीत आत्मघाती हल्ल्यात ३० जण ठार४ मार्च रोजी रावळपिंढीपासून जवळपास २०० किमी अंतरावर असलेल्या पेशावर येथील एका मशिदीत बॉम्बस्फो झाला आहे. यात ३० जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहे. यात आता क्रिकेट चाहत्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे की या हल्ल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाच्या संघानं माघारी परतण्याचा निर्णय घेतला तर मोठं नुकसान होईल.
पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांना बरीच वर्ष पाकिस्तानातील क्रिकेट स्टेडियम्समध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाहता आलेला नाही. तसंच पाक क्रिकेट बोर्डालाही मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. यात आता ऑस्ट्रेलियाचा संघ दौऱ्यावर असताना देशात असा आत्मघाती हल्ला होणं पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी आणखी डोकेदुखी वाढवणारं ठरू शकतं.