नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकातून वेस्ट इंडिजचा संघ बाहेर झाला आहे. संघाच्या खराब कामगिरीनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने याबाबत अधिकृत माहिती दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर ते आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. फिल सिमन्स हे प्रशिक्षक असताना वेस्ट इंडिजने भारतात झालेला २०१६चा टी-२० विश्वचषक जिंकला होता.
दरम्यान, २०१६ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांना पुन्हा वेस्ट इंडिजच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना ३० नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरी आणि शेवटची कसोटी ८ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार आहे. खरं तर वेस्ट इंडिजच्या संघाला राउंड फेरीत नवख्या स्कॉटलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांना राउंड फेरीतील ३ सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला. अखेरच्या सामन्यात आयर्लंडच्या संघाने विंडिजला पराभवाची धूळ चारून विश्वचषकाचे तिकिट मिळवले.
आयर्लंडने वेस्ट इंडिजला विश्वचषकातून केले बाहेरविश्वचषकात सुपर-१२ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ८ संघामध्ये सामने झाले. ब गटातील वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात सामना पार पडला, ज्याच्यात नवख्या आयर्लंडने विजय मिळवून २ वेळच्या विश्वविजेत्या विंडिजला विश्वचषकातून बाहेर केले. आयर्लंडने ९ गडी राखून मोठा विजय मिळवला आणि वेस्ट इंडिजचा पत्ता कट केला. प्रथम फलंदाजी करताना विडिंजच्या संघाने २० षटकांत ५ बाद १४६ धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग आयर्लंडच्या संघाने केवळ १ गडी गमावून १७.३ षटकांत पूर्ण केला. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. किंगने ४८ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी करून आयर्लंडच्या गोलंदाजांविरूद्ध एकतर्फी झुंज दिली. आयर्लंडकडून गॅरेथ डेलनीने सर्वाधिक ३ बळी पटकावून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"