विराट कोहली आणि रोहित शर्मा हे टीम इंडियाचे दोन प्रमुख फलंदाज आहेत. विराटनं २००८मध्ये पदार्पण केलं आणि तो संघाचा नियमित सदस्य आहे. पण, रोहितला राष्ट्रीय संघातील स्थान पक्क करण्यासाठी सहा वर्ष लागली. मात्र, त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिले नाही आणि मर्यादित षटकांच्या संघात त्यानं त्याचं स्थान मजबूत केलं. कसोटी क्रिकेटमध्येही नुकतीच त्याची उप कर्णधार म्हणून निवड झाली. २०१९मध्ये त्याला कसोटी संघात सलामीला खेळवण्यात आले आणि आता त्याच्या कारकीर्दिला वेगळं वळण मिळालं.
मागील १३ वर्ष रोहित व विराट हे संघ सहकारी आहेत आणि एकमेकांना चांगले ओळखून आहेत. या दोघांना एकमेकांच्या बारीक सवयीही माहीत झाल्या आहेत. या दोघांच्या वादाच्या चर्चाही अनेकदा रंगल्या, परंतु विराटनं नुकतंच त्याच्यावर पुन्हा एकदा पूर्णविराम लावला. त्यानंतर विराटच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यात त्यानं रोहितबद्दल मजेशीर किस्सा सांगितला आहे. गौरव कपूर याच्या Breakfast with Champions या कार्यक्रमात विराटनं २०१७सालचा एक किस्सा सांगितला. यात त्यानं रोहितच्या विसराळू स्वभावाबद्दल सांगितलं.
फोन, पाकिट, ipad ते पासपोर्ट, रोहित हे सर्व दौऱ्यावर असताना विसरायचा, असं विराटनं सांगितलं. तो म्हणाला,''रोहित शर्मा बऱ्याच गोष्टी विसरतो. एवढा विसराळू व्यक्ती मी कधी पाहिला नव्हता. iPad, wallet, phone... या लहानसहान गोष्टी नाही, तर तो दैनंदिन वापराच्या गोष्टीही विसरतो. तो म्हणायचा मला पर्वा नाही, मी नवीन घेईन. त्यालाच माहीत नसायचे की तो नेमकं काय विसरला आहे. टीम बस जेव्हा प्रवासात अर्धा टप्पा पार करायची तेव्हा रोहितला काहीतरी विसरल्याचे आठवायचे. तो पासपोर्टही विसरला आहे. लॉजिस्टीक मॅनेजर नेहमी त्याला विचारायचे, सर्व सामान सोबत घेतलं आहेस ना?, तो जेव्हा हो म्हणायचा, तेव्हा बस सोडली जायची.''
याच मुलाखतीत विराटनं रोहितच्या फलंदाजी कौशल्याचं कौतुक केलं.
पाहा व्हिडीओ...