- सतीश जाधव
गेल्या काही वर्षांत मानवी जीवनशैलीमध्येही आमूलाग्र बदल झाले आहेत. तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे मानवी जीवन सुखकर बनले असले तरी त्यातून काही समस्याही निर्माण झाल्या आहेत. आरामदायक जीवनशैली, आहार-विहारामध्ये झालेले बदल शारीरिक तंदुरुस्तीची समस्यासुद्धा गंभीर बनली आहे. त्यामुळे शारीरिक, बौद्धिक, भावनिक तंदुरुस्तीसाठी शारीरिक शिक्षण घेणे अनिवार्य बनले आहे.
आज शिक्षण घेत असलेल्या मुलांचा विचार केला असता त्यांच्यावर अभ्यासाचा खूप ताण आहे. तसेच मुलांकडून होणारा मोबाइल, संगणकाचा वापरही वाढलेला आहे. विभक्त कुटुंब पद्धती आल्याने मुलांमधील एकलकोंडेपणा वाढीस लागला आहे. त्यामुळे अशा मुलांकडे असलेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी त्यांना शारीरिक शिक्षणाकडे वळवणे आवश्यक आहे.
शारीरिक हालचालींमधून मिळणाऱ्या अनुभवांच्या ज्ञानाला शारीरिक शिक्षण म्हटले जाते. मुलांमधील कार्यक्षमतेचा विकास, शरीरातील स्नायू व मज्जासंस्थांचा विकास, व्यक्तिमत्त्वाचा विकास, निर्णयशक्तीचा विकास ही उद्दिष्टे शारीरिक शिक्षणामधून साधली जात असतात. पूर्वीच्या काळी मुलांचा बराच काळ खेळण्या-बागडण्यात जात असे. त्यामुळे या मुलांचा व्यायाम नैसर्गिक पद्धतीने होत असे. अशी मुले मानसिकदृष्ट्या कणखर असत. मात्र आज मुलांचा मैदानी खेळांकडे असलेला ओढा कमी झाला आहे. अशी मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत बनत आहेत. त्यातून शिक्षण, परीक्षेतील अपयशामुळे होणाºया मुलांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच आजकाल अगदी पाच-सहा वर्षांच्या मुलांमध्ये डायबिटीस, अधू नजर अशा समस्या वाढीस लागल्या आहेत. या बाबी टाळायच्या असतील तर मुलांना मैदानाकडे वळवणे आवश्यक आहे.
आज अनेक जण जिमला जातात. मात्र शारीरिक तंदुरुस्तीपेक्षा बॉडी बनण्यापुरताच त्यांच्या उद्देश मर्यादित असतो. आपल्याकडे डॉक्टरांनी सल्ला दिला, वजन वाढले, इतर त्रास सुरू झाला की माणसे शारीरिक शिक्षण, योग, व्यायाम आदींकडे वळतात. त्यामागे उत्स्फूर्तपणापेक्षा अपरिहार्यता अधिक असते. त्यातही वेळ मिळत नाही म्हणून व्यायामाला टाळाटाळ करणाºया मंडळींचे प्रमाण अधिक असते. अशा मंडळींनी वेळ मिळत नाही ही सबब सांगण्यापेक्षा आपल्याकडील प्रचलित सूर्यनमस्कार घातले, श्वसनाच्या व्यायामाचे प्रकार केले तरीसुद्धा त्यांना दिवसभर लागणारी ऊर्जा, शारीरिक-मानसिक तंदुरुस्ती मिळू शकते. मोकळ्या हवेत फिरायला जाणे, चालणे यामधूनही व्यायाम होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक शिक्षण तसेच तंदुरुस्तीकडे अपरिहार्यता म्हणून नव्हे तर उत्तम आरोग्यासाठीचा सोपा मार्ग म्हणून वळले पाहिजे.
(लेखक मल्लखांबचे राष्ट्रीय पंच आहेत.)
(शब्दांकन : बाळकृष्ण परब)
Web Title: Physical education is inevitable for health.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.