मॅन्चेस्टर : ओव्हल येथे चौथा कसोटी सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघ शुक्रवारपासून रंगणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाच्या निर्धाराने खेळेल. भारतीय संघाला चिंता आहे ती उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फॉर्मची. रहाणेला लौकिकानुसार खेळ करता आलेला नाही.
जसप्रीत बुमराह भारताचा मुख्य गोलंदाज असून, त्याच्यावर बराच भार असल्याचे दिसून आले आहे. त्याने गेल्या महिनाभरात एकूण १५१ षटके गोलंदाजी केली आहे. फलंदाजीस पोषक खेळपट्टीवर रहाणे अपयशी ठरल्याने, त्याला आणखी एक संधी द्यावी की नाही, असा विचार संघ व्यवस्थापन करत आहे. हवामान खात्याने या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवली असल्याने आणि मालिकेतील अखेरचा सामना असल्याने कर्णधार कोहली, रहाणेला अखेरची संधी देऊ शकतो. मात्र, यावेळीही अपयशी ठरल्यास रहाणेच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला मोठा धक्का बसू शकतो. रहाणेला संधी न मिळाल्यास सूर्यकुमार यादव किंवा हनुमा विहारी यांना भारतीय संघात स्थान मिळू शकेल. तसेच, बुमराहवरील असलेला भार पाहून त्याला कदाचित विश्रांती मिळू शकेल. मोहम्मद शमी पूर्ण तंदुरुस्त झाल्याने त्याचे स्थान जवळपास निश्चित आहे. गोलंदाजीस पोषक खेळपट्टीवर बुमराहला संघाबाहेर ठेवणे योग्य ठरणार असले, तरी आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ धोका पत्करू इच्छित नाही. वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूरचे खेळणे निश्चित मानले जात आहे.
अश्विनला संधी मिळणार?रविचंद्रन अश्विनला अखेरच्या सामन्यात संधी मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अष्टपैलू म्हणून शार्दुलने छाप पाडली असल्याने याचा फायदा अश्विनला काहीअंशी मिळू शकतो. त्यामुळे रवींद्र जडेजाऐवजी अश्विन अंतिम संघात स्थान मिळवू शकतो.
प्रतिस्पर्धी संघ :भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ॠषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यू इश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर.इंग्लैंड : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, हसीब हमीद, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, डॅन लॉरेन्स, ओली रॉबिन्सन, सॅम कुरेन, मार्क वुड, जेम्स ॲंडरसन, जॅक लीच, ओली पोप, डेविड मलान आणि क्रेग मलान.
भारतीय खेळाडूंचा अहवाल निगेटिव्हभारतीय संघातील अन्य खेळाडूंच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने भारताला मोठा दिलासा लाभला. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसारभारतीय खेळाडू निगेटिव्ह असून खेळण्यास सज्ज असल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले.त्याआधी, गुरुवारी झालेल्या कोरोना चाचणीत आणखी एक सहयोगी स्टाफ योगेश परमार पॉझिटिव्ह आढळताच सराव रद्द करण्यात आला होता. मुख्य कोच रवी शास्त्री, गोलंदाजी कोच भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण कोच आर. श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल हे आधीपासून क्वारंटाईन आहेत. केवळ फलंदाजी कोच विक्रम राठोड संघासोबत आहेत.
अखेरचा सामना जिंकू : जोस बटलरइंग्लंडचा उपकर्णधार जोस बटलर याच्यामते मॅन्चेस्टर मैदानावरील पाचवा कसोटी सामना संघासाठी अखेरची आशा असेल. आम्ही हा सामना जिंकून मालिका बरोबरी सोडवू इच्छितो, असे बटलर म्हणाला. सामन्याआधी भारतीय संघाचे ज्युनियर फिजिओ कोरोनाबाधित झाल्यामुळे सामन्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याविषयी विचारताच बटलर म्हणाला,‘प्रामाणिकपणे सांगायचे तर सध्या मनात जिंकण्याचाच विचार आहे. आम्ही सामन्यासाठी सज्ज असून आमच्या संघात सर्वजण ठणठणीत आहेत.’ बटलर ओव्हल कसोटीदरम्यान पितृत्व रजेवर गेला होता. हा सामना भारताने जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी संपादन केली. ‘ भारताने ओव्हलवर सरस खेळ करीत विजय संपादन केला मात्र आता आम्ही दमदार खेळाच्या बळावर सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवू इच्छितो,’ असा आशावाद बटलरने व्यक्त केला. जेम्स ॲन्डरसन या सामन्यात खेळणार असल्याचे देखील बटलरने स्पष्ट केले.