Join us  

भारतीय संघासाठी फिजिओ ठरणार निर्णायक; मुलुंडच्या भाविका पारेखकडे खेळाडूंच्या तंदुरुस्तीची विशेष जबाबदारी

दुबई येथे सुरू असलेल्या दृष्टीहीन क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाला संभाव्य विजेते मानले जात आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच भारतीय संघ फिजिओसह रवाना झाल्याने खेळाडूंना कामगिरीत सुधारणा करण्यास अधिक वाव मिळणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 11:28 PM

Open in App

- रोहित नाईकमुंबई : दुबई येथे सुरू असलेल्या दृष्टीहीन क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघाला संभाव्य विजेते मानले जात आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच भारतीय संघ फिजिओसह रवाना झाल्याने खेळाडूंना कामगिरीत सुधारणा करण्यास अधिक वाव मिळणार आहे. मुलुंडची युवा २४ वर्षीय फिजिओ भाविका पारेख ही स्वयंसेवक म्हणून भारतीय खेळाडूंवर उपचार करत असून दखल घेण्याची बाब म्हणजे संघासोबत फिजिओ असलेला भारतीय संघ दृष्टीहीन क्रिकेटविश्वातील केवळ तिसरा संघ ठरला आहे.याआधी केवळ आॅस्टेÑलिया व इंग्लंड या संघांकडेच फिजिओ उपलब्ध होता. परंतु, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) कांगा लीगसाठी ‘फिजिओ’ म्हणून काम पाहत असलेल्या भाविकासह गेल्या वर्षी भारतात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान क्रिकेट असोसिएशन फॉर दी ब्लाइंड इन इंडिया (कॅबी) यांनी संपर्क केला आणि भारतीय संघातील खेळाडूंमध्ये मोठा बदल झाला. जेव्हा भाविका भारतीय संघासोबत जुळली तेव्हा तिला भारतात आलेल्या कोणत्याही संघाकडे फिजिओ नसल्याचे कळले आणि तिने आपल्या टीममधील इतर फिजिओ प्रत्येक संघाकडे पाठवले.भाविका व तिच्या न्यू रिलिफ टीमचे काम पाहून ‘कॅबी’ने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी फिजिओ म्हणून भाविकाची निवड केली. फिजिओ मिळाल्याने भारतीयांच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाल्याचे भाविका सांगते. ‘महिला डॉक्टर असल्याने खेळाडू सुरुवातीला उपचार करून घेण्यास संकोच करायचे. परंतु, त्यांना उपचाराचे महत्त्व पटल्यानंतर खेळाडू स्वत:हून पुढे येऊ लागले. यामुळे त्यांना दुखापतीतून सावरण्यास मदत मिळाली. दृष्टीहीन क्रिकेट अत्यंत वेगळे असल्याने या खेळाडूंना सोयी-सुविधा जास्त नव्हत्या. पण आता चित्र बदलत आहे,’ असे भाविकाने ‘लोकमत’ला सांगितले.‘दृष्टीहीन खेळाडूंना उपचाराच्या पद्धती समजावणे आमच्यासाठीही मोठे आव्हान होते. त्यामुळे सर्व काही बोलून करावे लागत आहे. प्रत्येक वेळी ‘वॉर्मअप’ देत असल्याने संघ अधिक तंदुरुस्त झाला आहे. शिवाय प्रत्येक खेळाडूला त्यांच्या स्नायूनुसार वैयक्तिक टेÑनिंग दिले जाते. हे सर्व करत असताना आम्ही फिजिओचा दर्जा कमी केला नाही. यामुळे त्यांची कामगिरी उंचावत आहे. जे संथ गोलंदाज होते, आता त्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे भारतीय संघाला याचा नक्कीच फायदा होईल,’ असेही भाविकाने म्हटले.स्वयंसेवक म्हणून भारतीय खेळाडूंवर उपचार करत असलेली भाविका ‘कॅबी’कडून मानधन घेत नाही. लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिलेल्या भाविकाने पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातून पदवी मिळवली. शिवाय तिने विविध ११ आंतरराष्ट्रीय वैद्यकीय कोर्सेसही पूर्ण केले.

टॅग्स :क्रिकेट