मुंबई - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. या सामन्यात विराटचे शतक महत्त्वपूर्ण ठरले. तर टीम इंडियाचा मॅच फिनिशर महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा तडाखेबंद खेळी करत टीकाकारांना उत्तर दिले. धोनीवर टीका करणाऱ्यांना माहीने आपल्या बॅटने उत्तर दिले. या सामन्यातील विजयाचे विरेंद्र सेहवागने नेहमीप्रमाणे त्याच्या स्टाईलने कौतुक केलं आहे. तर, धोनीचा फोटो शेअर करून पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.. अशी टॅगलाईनही लिहिली आहे.
महेंद्रसिंह धोनीने दुसऱ्या सामन्यात दमदार नाबाद अर्धशतक साकारले. हे अर्धशतक साकारताना धोनीने आपण अजूनही मॅच फिनिशर आहोत, हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. याच अॅडलेडच्या मैदानात धोनीने भारताला 2012 सालीही सामना जिंकवून दिला होता. कोहली बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनीने आपल्या भात्यातील फटके बाहेर काढले आणि आपण मॅच फिनिशर कसे आहोत, हे पुन्हा एकदा दाखवून दिले. धोनीने 54 चेंडूंत दोन षटकारांसह नाबाद 55 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.
धोनीने 2012 साली कर्णधारपदी असताना भारताला सामना जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. 2012 सालीही धोनीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्याच मैदानात पुन्हा एकदा धोनीला सूर गवसला आहे. धोनीच्या कालच्या खेळीचे कौतुक करताना माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त.. अशी टॅगलाईन दिली. तर कर्णधार कोहलीच्या विराट शतकाचीही प्रशंसा केली. विराटने वंडरफूल खेळी केली, तर धोनी आणि कार्तिकने त्यांच्या स्टाईलने मॅच फिनिश केली. तर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही विराट, धोनी आणि कार्तिकचे कौतुक केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या दिग्गजांनी टीम इंडियाच्या या शिलेदारांवर कौतुकाचा वर्षाव केला.