Retirement: भारतीय क्रिकेटप्रेमी २०११ हे वर्ष कधीच विसरू शकणार नाही. १९८३ नंतर तब्बल २८ वर्षांनी भारतीय संघाला याच वर्षी वन डे विश्वचषक उंचावण्याचा मान मिळाला होता. आपला सहावा वन डे वर्ल्डकप खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला इतर सहकाऱ्यांनी हे विजयाचं गिफ्ट दिलं. World Cup 2011 मध्ये भारतीय संघ अफलातून फॉर्ममध्ये होता. सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दोघेही भरपूर धावा लुटत होते. पण एकाच सामन्यात या दोघांचीही विकेट घेणारा एक गोलंदाज होता. तो म्हणजे पीटर सीलार (Pieter Seelaar). त्याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.
नेदरलँड्सचा कर्णधार पीटर सीलारने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळणाऱ्या सीलारने हा मोठा निर्णय घेतला. सीलार दोन वर्षांपासून पाठदुखीशी झुंज देत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या पाठीला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. पुन्हा एकदा त्याच दुखापतीने उचल खाल्ल्यामुळे सीलारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.
बलाढ्य संघांविरूद्ध दमदार कामगिरी
पीटर सीलारने १५ वर्षांखालील स्तरावरून नेदरलँड्स मध्ये क्रिकेट करियरला सुरूवात केली. या डावखुऱ्या फिरकीपटूने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले. २००९ च्या टी२० विश्वचषकातील सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे नेदरलँड्सचा इंग्लंडवर विजय. नेदरलँड्सच्या इंग्लंडविरुद्धच्या या विजयाचाही हिरो पीटर सीलारच होता. या खेळाडूने इंग्लंडचा कर्णधार पॉल कॉलिंगवूडची विकेट घेतली. त्यानंतर पीटर सीलर २०११ च्या विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात सचिन आणि सेहवाग या दोघांच्याही विकेट घेतल्या होत्या.
Web Title: Pieter Seelaar Retirement from Cricket Netherlands Sachin Tendulkar Virender Sehwag 2011 Cricket World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.