मुंबई : क्रिकेटचा सामना पाहताना कॉमेन्ट्री कानावर पडल्याशिवाय मजा येत नाही. तिला भाषेचे बंधन नसते, शैली महत्त्वाची असते. पण विमानात बसल्यानंतर तांत्रिक सूचनांऐवजी क्रिकेटची कॉमेन्ट्री ऐकू आली तर? होय, मुंबई इंडियन्सचे खेळाडू अबूधाबीच्या दिशेने प्रवास करीत असताना त्यांच्यासोबत असाच प्रकार घडला. पायलटने सर्व सूचना कॉमेन्ट्रीच्या शैलीत आणि खेळाडूंच्या नावाचा उल्लेख करीत दिल्यामुळे त्यांना सुखद धक्का बसला.
आयपीएलचे उर्वरित सामने खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ १३ ऑगस्टला अबूधाबीच्या दिशेने रवाना झाला. मुंबई विमानतळावरून त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. या विमानाचा पायलट निघाला क्रिकेटवेडा. पठ्ठ्याने खेळाडूंना आश्चर्याचा धक्का देण्याची योजना आखली. विमान धावपट्टीवर आल्यानंतर पायलटने प्रवाशांना पुढील सूचना देण्यासाठी माइक हातात उचलला आणि जोरदार कॉमेन्ट्री सुरू केली. सुरुवातीला खेळाडूंनी त्याकडे दुर्लक्ष केले, पण जसजसा विमानाने वेग घेतला, तसतशी पायलटच्या कॉमेन्ट्रीला धार चढली. प्रत्येक सूचनेला मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा संदर्भ जोडून त्याने सर्वांना सुखद धक्का दिला. या अनोख्या हवाई सफरीमुळे खेळाडूही सुखावून निघाले.
असे केले समालोचन...‘९०६५ या चार्टर फ्लाइटमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे स्वागत. आपण मुंबईहून अबूधाबीच्या दिशेने उड्डाण करीत आहोत. आज सकाळपासूनच पावसाचे वातावरण असल्यामुळे रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक सामन्याची सुरुवात करतात त्याप्रमाणे आम्ही निर्गमनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली’.‘आपण एअरबस ३२१ विमानाने समुद्र सपाटीपासून ३ हजार फूट उंचीवर उड्डाण करीत आहोत. विमानाची गती ९०० किमी प्रति तास इतकी राखली जाईल. त्यामुळे आपण निर्धारित वेळेपेक्षा ४५ मिनिटे लवकर पोहोचू. उर्वरित वेळेत किरॉन पोलार्ड शतक ठोकू शकतो’.‘स्थानीय अंदाजानुसार पुढील काही वेळेत आपण ३२ अंश सेल्सिअस तापमानात प्रवेश करणार आहोत. आपला प्रवास खूपच शांततापूर्ण वातावरणात होत आहे. त्यामुळे २०१७ साली कोलकाता नाइट रायडर्स विरोधात जसप्रीत बुमराहने टाकलेल्या सुपर ओव्हरसारखा फिल येत आहे’.‘एअर ट्राफिकचे अडथळे न आल्यास शक्य तितक्या लवकर आपण गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. पण हार्दिक पंड्या आणि इशान किशनने बनवलेल्या अर्धशतकाच्या वेगाशी मी स्पर्धा करू शकणार नाही’.
व्हिडीओ पोस्ट तुफान व्हायरलइंडिगोने रेकॉर्ड केलेला हा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर प्रसारित केला. त्याला तुफान प्रतिसाद मिळत असून, पायलटच्या संवाद कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.