Pink Ball Test, IND vs SL 2nd Test: भारतीय संघ आजपासून श्रीलंकेविरूद्ध गुलाबी चेंडूने Day Night Test सामना खेळणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील ही दुसरी कसोटी असून बंगळुरूच्या मैदानावर हा सामना खेळण्यात येणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात एक महत्त्वाचा बदल केला असून जयंत यादवच्या (Jayant Yadav) जागी अक्षर पटेलला (Axar Patel) संघात स्थान दिले.
भारताने आतापर्यंत तीन डे-नाईट सामने खेळले आहेत. त्यापैकी २ सामन्यात भारताला विजय मिळाला आहे, तर एका सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहेत. श्रीलंकेनेदेखील तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. श्रीलंकेविरूद्धच्या कसोटीसाठी भारताने संघात एक महत्त्वाचा बदल केला. भारतीय संघाने पहिल्या ते सातव्या क्रमांकाच्या खेळाडूंमध्ये एकही बदल केला नाही. पण पहिल्या सामन्यात फारशी चमक न दाखवू शकलेला जयंत यादव याचा संघातील पत्ता कट झाला. त्याच्या जागी स्पिनर म्हणून अक्षर पटेलला संघात स्थान मिळाले.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ-रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अक्षर पटेल
भारताचा डे-नाईट टेस्ट मधील रेकॉर्ड
भारताने पहिली डे-नाईट कसोटी कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळली होती. २०१९ मध्ये बांगलादेशच्या संघाविरूद्ध खेळलेली कसोटी भारताने एक डाव आणि ४६ धावांनी जिंकली होती. तर दुसरी डे-नाईट कसोटी ऑस्ट्रेलियात अडलेड येथे खेळली. २०२० साली झालेल्या या कसोटी सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून सहज पराभूत केलं होते. पण टीम इंडियाने तिसऱ्या डे-नाईट कसोटीत इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. अहमदाबाद येथे २०२१मध्ये झालेल्या कसोटी भारताने इंग्लंडवर १० गडी राखून विजय मिळवला होता.