कोलकाता : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे. टीम इंडियानं इंदूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतानं पहिली कसोटी अडीच दिवसातच खिशात घातली. दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या कसोटीमध्ये सर्वांना 'पिंकू-टिंकू' पाहायला मिळणार असल्याचे समजले जात आहे.
कोलकाताच्या इडन गार्डन्सवर ऐतिहासिक सामन्याची जोरदार तयारी सुरु आहे. मैदानामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी यावेळी पाहायला मिळणार आहेत. या सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडू वापरण्यात येणार आहे. त्यामुळे मैदानात गुलाबी रंगाचे फुगे लावण्यात येणार आहेत.
गांगुली इडन गार्डन्सवर सर्व गोष्टींची जातीने पाहणी करत आहे. आज गांगुलीचा एक फोटो चांगलाच वायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये गांगुलीच्या हातामध्ये कसोटी सामन्याच्या तिकीटाची प्रातिनिधक प्रत आहे. त्याचबरोबर या फोटोमध्ये 'पिंकू-टिंकू'ही दिसत आहेत.
आता तुम्ही विचारात पडला असाल की, हे 'पिंकू-टिंकू' आहेत तरी कोण? आणि त्यांचा क्रिकेटशी संबंध काय? तर प्रत्येक मोठ्या स्पर्धेसाठी शुंभकर ठेवण्याची परंपरा आहे. भारतासाठी हा सामना ऐतिहासिक आहे. त्यामुळे या सामन्यासाठी 'पिंकू-टिंकू' यांना शुभंकर म्हणून ठेवण्यात आले आहे.