भारतात कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचल्यास आयपीएल २०२२चे आयोजन यंदा यूएईत नव्हे तर दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेत होईल. त्यासाठी प्लान बी तयार असला तरी याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. बीसीसीआय कोरोनाच्या सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. १५व्या पर्वात संघांची संख्या आठवरून दहावर जाईल. यंदा मेगा लिलावाचे आयोजन होईल, त्यामुळे अनेक चेहरे नव्या संघात दिसतील. देशातील परिस्थिती बिघडली आणि आयपीएल परदेशात हलवणे हाच एकमेव पर्याय वाटत असेल, तर बीसीसीआय दक्षिण आफ्रिकेला पहिली पसंती देईल, या देशात २००९ मध्ये आयपीएल खेळविण्यात आली होती.
द. आफ्रिका ‘राईट चॉईस’...
बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, ‘गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करावी लागली. यंदा ही स्पर्धा यूएईतून बाहेर काढायची आहे. केवळ एका देशावर अवलंबून राहू शकत नाही. आम्ही आणखी पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे.’ भारताचा टाइम झोन दक्षिण आफ्रिकेपेक्षा साडेतीन तास पुढे आहे. यूएई किंवा भारताप्रमाणेच, आयपीएलमधील रात्रीचे सामने लवकर सुरू करावे लागतात. प्रसारक संध्याकाळी साडेसातच्या त्यांच्या पसंतीच्या वेळेवर अडून राहिल्यास, दक्षिण आफ्रिकेत सामन्याचा पहिला चेंडू ४ वाजता टाकला जाईल. गेल्या काही वर्षांत खेळाडूंनी अनेकदा मध्यरात्रीनंतर सामने संपत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
श्रीलंकेचाही पर्याय
आयपीएलचे १३ वे सत्र कोरोनामुळे काही काळ स्थगित करण्यात आले त्यावेळी श्रीलंका क्रिकेटने लीगच्या आयोजनाची तयारी दाखविली होती. लंकेत अलीकडे श्रीलंका प्रीमियर लीगचे आयोजन शानदारपणे पार पडले. अशा वेळी बीसीसीआयसाठी श्रीलंका हादेखील उत्कृष्ट पर्याय ठरू शकेल.