भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) मैदानावर जसा बिनधास्त खेळायचा, तसाच तो बोलण्यातही बेधडक आहे. बांगलादेशला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेकडून ४ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर सेहवागने बांगलादेशचा अनुभवी खेळाडू शाकिब अल हसनला धारेवर धरले.
वीरेंद्र सेहवाग क्रिकबझवर म्हणाला,''गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत मला वाटले की त्याची ट्वेंटी-२० संघात निवड होऊ नये. तो खूप आधी निवृत्त व्हायला हवा होता. तू इतका वरिष्ठ खेळाडू आहेस, तू या संघाचा कर्णधारही होतास. तुझ्या अलीकडील कामगिरीची तुला लाज वाटली पाहिजे. तू स्वतः पुढे ये आणि म्हणावे की खूप झाले, मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे.''
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शाकिब अल हसन ४ चेंडूत केवळ ३ धावा करून बाद झाला होता. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आफ्रिकेने ६ विकेट्सवर ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकांत ७ बाद १०९ धावा करता आल्या. सेहवाग पुढे म्हणाला, ''जर तुझी वर्ल्ड कप टीममध्ये अनुभवासाठी निवड झाली असेल, तर ते सिद्ध करा की तो योग्य निर्णय होता. तू कमीत कमी थोडा वेळ क्रीजवर घालवला पाहिजे. हुक आणि पुल शॉट खेळण्यासाठी तू ॲडम गिलख्रिस्ट किंवा मॅथ्यू हेडन नाही. तू बांगलादेशी खेळाडू आहेस आणि तुझ्या कुवतीप्रमाणे खेळ.''
३७ वर्षीय शाकिब अल हसनने बांगलादेशसाठी आतापर्यंत एकूण ६७ कसोटी, २४७ वन डे आणि १२३ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४५०५ धावा, वन डेत ७५७० धावा आणि ट्वेंटी-२०त २४४८ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत २३७, वन डेत ३१७ आणि ट्वेंटी-२०त १४६ बळी आहेत.