मस्कत : ‘गोलंदाजांना प्रत्येक सामन्यात खेळताना पाहणे मला आवडेल. कार्यभार व्यवस्थापन नियमांतर्गत खेळाडूंना विशेष करून वेगवान गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय सामन्यात विश्रांती देणे मला पसंत नाही. मी विश्रांती देण्याच्या या नियमाविरुद्ध आहे,’ अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने दिली.
व्यस्त क्रिकेट वेळापत्रकाशिवाय, कोरोना महामारीदरम्यान बयो-बबलमध्ये रहावे लागत असल्याचाही खेळाडूंवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक खेळाडूंनी नाईलाजाने खेळापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. याबाबत लीने लीजेंड्स क्रिकेट लीग स्पर्धेदरम्यान आपले मत मांडले. नुकताच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली होती. तसेच, आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठीही निवडकर्त्यांनी शमीसह जसप्रीत बुमराहलाही विश्रांती दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारताच्या कामगिरीबाबत लीने सांगितले की, 'भारताची कामगिरी वेगळी झाली.' कारण, याच संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात नमवले होते आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धही २-१ अशी आघाडी घेतली. ली म्हणाला की, 'कधी कधी अशी कामगिरी होते. भारतीय खेळाडू खूप चांगले क्रिकेट खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील त्यांची कामगिरी शानदार ठरली होती. ऑस्ट्रेलिया सध्या अव्वल कसोटी संघ आहे. पण भारतीय संघही खूप चांगला संघ आहे. दक्षिण आफ्रिका संघाने आपल्या मायदेशातील परिस्थितींचा फायदा घेत खूप चांगला खेळ केला.'ॲशेसमधील ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीविषयी ली म्हणाला की, 'आम्ही ४-० ने जिंकलो. माझ्या मते कर्णधार म्हणून पॅट कमिन्सने खूप चांगली कामगिरी केली. त्याचे नेतृत्त्व प्रभावी ठरले आणि त्याने आपल्या आजूबाजूच्या सर्व शानदार खेळाडूंचे समर्थन केले.'
n 'जर वेगवान गोलंदाजांना कोणती दुखापत झाली असेल, तरच त्यांना विश्रांती देण्यात यावी. वेगवान गोलंदाजांना कठोर मेहनत करताना आणि नेहमी खेळताना पाहणे मला आवडेल.'