Join us  

मुंबईला ‘प्ले ऑफ’ तिकिट; हैदराबादचा उडवला ८ गड्यांनी धुव्वा

ग्रीनने नाबाद शतक झळकावत मुंबईचा विजय साकारला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 5:26 AM

Open in App

रोहित नाईक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कॅमरुन ग्रीनच्या स्फोटक शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला. ग्रीनने नाबाद शतक झळकावत मुंबईचा विजय साकारला. हैदराबादने २० षटकांत ५ बाद २०० धावा केल्यानंतर मुंबईने १८ षटकांमध्येच २ बाद २०१ धावा केल्या. यासह राजस्थान रॉयल्सचे आव्हान संपुष्टात आले. अन्य सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) नमवल्याने मुंबईचा प्ले ऑफमध्ये प्रवेश झाला. कॅमेरून ग्रीन सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.

धावांचा पाठलाग करताना मुंबईकरांपुढे मोठे आव्हान होते, ते धावगती सुधारण्याचे. आरसीबीची धावगती गाठण्यासाठी मुंबईला हे लक्ष्य ११.४  षटकांमध्ये पार करणे गरजेचे होते. कर्णधार रोहित शर्मा आणि ग्रीन यांनी दुसऱ्या गड्यासाठी केवळ ६५ चेंडूंत १२८ धावांची तुफानी भागीदारी करत हैदराबादला रडकुंडीला आणले. मयांक डागरने १४व्या षटकात रोहितला बाद करत ही जोडी फोडली. मात्र, यानंतर ग्रीन अधिकच आक्रमकपणे खेळला. ग्रीनने २१२च्या स्ट्राइक रेटने हैदराबादच्या गोलंदाजांना चोपले. दुसऱ्या टोकाकडून सूर्यकुमार यादवनेही दमदार फटकेबाजी केली.

विव्रांताने तारलेतत्पूर्वी विव्रांत शर्माने अर्धशतक झळकावताना मयांक अग्रवालसोबत ८३ चेंडूंत १४० धावांची सलामी दिली. मयांकनेही अर्धशतक झळकावले.  परंतु, दोघेही बाद झाल्यानंतर हैदराबादची धावगती मंदावली. वेगवान गोलंदाज आकाश मढवालने हैदराबादला राखले. हैदराबादला अखेरच्या पाच षटकांत केवळ ४३ धावाच काढता आल्या.

महत्त्वाचेविव्रांत शर्मा आयपीएल पदार्पणात सर्वाधिक धावा  करणारा भारतीय ठरला. त्याने स्वप्नील आसनोडकरची (२००८) ६० धावांची खेळी मागे टाकली. आकाश मढवाल हा चार बळी घेणारा मुंबईचा दुसरा अनकॅप्ड गोलंदाज ठरला. याआधी राहुल चहरने अशी कामगिरी केली.

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्स
Open in App