नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने कोविड-१९ महामारीची तुलना पाच दिवसीय सामन्यासोबत केली आहे. तो म्हणाला, या संकटातून सावरण्यासाठी प्रत्येकाने धैर्य कायम ठेवत दृढसंकल्प राखायला हवा. त्याचप्रमाणे थोडा पुढाकारही घ्यायला हवा. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटपटूंमध्ये हे सर्व गुण प्रामुख्याने दिसून येतात.
चॅपेलने आपला मुद्दा मांडताना सचिन तेंडुलकर व सहकारी आॅस्ट्रेलियन सलामीवीर इयान रेडपाथ यांच्या प्रभावी खेळींचे उदाहरण दिले.चॅपेलने आपल्या स्तंभात म्हटले की, ‘सध्याचा कालावधी जगभरातील अनेक नागरिकांसाठी परीक्षेची घडी आहे. खेळामध्ये आपली छाप सोडणाऱ्या खेळाडूंना लागू होणारे नियम जीवनात उपयुक्त ठरतात, असे मी शिकलो आहे. कोविड-१९ महामारीचा प्रकोप असताना सर्व देशातील नागरिकांनी धैर्य, दृढसंकल्प राखत थोडा पुढाकार घेण्याची गरज आहे. उच्च पातळीवर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी हे गुण असणे आवश्यक ठरते.’चॅपेलने तेंडुलकरने १९९८ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई कसोटी सामन्यातील खेळीचे उदाहरण दिले. तेथे सचिनने आक्रमक खेळीने शेन वॉर्नवर वर्चस्व राखले होते. चॅपेल म्हणाला, ‘मी माझ्या वक्तव्याचे समर्थन करताना मी दोन खेळींची निवड केली आहे. पहिली खेळी सचिन तेंडुलकरने १९९८ मध्ये चेन्नईमध्ये केलेली आहे. त्याने दुसºया डावात शानदार १५५ धावा फटकावल्या होत्या आणि त्यामुळे भारताने कसोटी सामना जिंकला होता. सचिनने मालिकेपूर्वी केलेली तयारी महत्त्वाची होती. त्याशिवाय हे शक्य झाले नसते.’चॅपेल पुढे म्हणाला, ‘सचिनने त्यावेळी माजी भारतीय अष्टपैलू रवी शास्त्री यांना विचारले होते जर शेन वॉर्न राऊंड द विकेट गोलंदाजी करीत खेळपट्टीच्या खरबडीत पृष्ठभागाचा वापर करीत असेल तर त्याच्याविरुद्ध वर्चस्व कसे गाजवायचे. शास्त्रीचे उत्तर त्याला समजण्यासारखे होते. शास्त्रीने म्हटले की, माझ्या उंचीमुळे मी पुढे सरसावत वॉर्नचा चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळत होतो, पण तू तसे करू नको.वॉर्नविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारायला हवा.’ चॅपेल पुढे म्हणाला, ‘या सल्ल्यानंतर तेंडुलकरने एमआरएफ नेट््समध्ये माजी भारतीय लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामाकृष्णनच्या अशा प्रकारच्या गोलंदाजीवर सराव केला.’ सचिनच्या सर्वोत्तम खेळींपैकी ही एक खेळी असल्याचे चॅपेलने म्हटले आहे. त्यात सचिनची प्रतिबद्धता दिसली, असेही चॅपेल म्हणाला. त्याचसोबत चॅपेलने रेडपाथची १९७६ मध्ये मेलबोर्नमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या खेळीचा उल्लेख केला. सचिनचा पुढाकार व दृढसंकल्प याच्यासोबत रेडपाथच्या धैर्याचा समावेश करा. त्यानंतर तुमच्याकडे या महामारीपासून बचावासाठी आवश्यक ते गुण येतील, असेही चॅपेल म्हणाला. (वृत्तसंस्था)