क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंडमध्ये खेळाडू भत्ता घोटाळा उघडकीस आला. स्थानिक पोलिसांकडून क्रिकेट पदाधिकाऱ्यांची चौकशीदेखील सुरू झाली आहे. चौकशीतून पुढे आलेल्या बाबी धक्कादायक आहेत.
संघटनेने जेवण आणि पाणी यासाठी १.७४ कोटींहून अधिक, केळी खरेदीचे बिल ३५ लाख, दैनंदिन भत्ता ४९.५ लाख रुपये, लॉकडाऊनच्या काळात दौऱ्यासाठी ११ कोटींचा खर्च केला. इतका सर्व खर्च केल्यानंतर खेळाडूंना मात्र पैसे दिले नाहीत. खेळाडू निवडीत अनियमितता, सक्तीची वसुली आणि खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी असे आरोप पदाधिकाऱ्यांवर करण्यात आले आहेत. उत्तराखंड पोलिसांनी संघटनेचे सचिव माहीम वर्मा, मुख्य कोच मनीष झा आणि प्रवक्ता संजय गुसाई यांची चौकशी केली.
डेहराडूनचे विशेष पोलीस महानिरीक्षक जन्मजय खंडुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. कलम १२० बी, ३२३, ३८४, ५०४ आणि ५०६ नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. १९ वर्षांखालील संघातील माजी खेळाडू आर्य सेठीचे वडील वीरेंद्र सेठी यांनी ही तक्रार केली. त्यात आपल्या मुलाला गेल्या वर्षी विजय हजारे स्पर्धेदरम्यान झा, संघ व्यवस्थापक नवनीत मिश्रा आणि व्हिडिओ विश्लेषक पीयूष रघुवंशी यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
रणजी करंडकासाठी संघात निवड करण्यासाठी दहा लाख रुपये मागितल्याचा आरोपही आहे. खेळाडूंना दैनंदिन दीड हजार रुपये भत्ता देणे अनिवार्य असताना केवळ १०० रुपये दिले जातात. स्पर्धा आणि प्रशिक्षण काळात जेवण दिले नाही. मात्र, उत्तराखंड बोर्डाने ३१ मार्च २०२० च्या अंकेक्षण अहवालात भोजन आणि अन्य गोष्टींसाठी १,७४,०७,३४६ इतका खर्च दाखवला. दैनंदिन भत्त्यासाठी ४९,५८,७५० रुपये इतका खर्च दाखवला. केळी खरेदीवर ३५ लाख आणि पाण्यासाठी २२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला.