कोलकाता : कोविड-१९ लॉकडाऊनदरम्यान करारबद्ध नसलेल्या व अंडर-१९ खेळाडूंना मानसिक कणखरतेची शिकवण मिळाली. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने या खेळाडूंना व्यावसायिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
द्रविडने राजस्थान रॉयल्सच्या मानसिक स्वास्थ्याबाबत आयोजित वेबिनारमध्ये कबूल केले की, क्रिकेटपटूंसाठी हा अनिश्चिततेचा कालावधी ठरला. त्यामुळे त्यांच्यावर मानसिकदृष्ट्या प्रभाव पडण्याची शक्यता होती. द्रविड म्हणाला, ‘लॉकडाऊनदरम्यान आम्ही या मुद्यावर (व्यावसायिकांच्या माध्यमातून खेळाडूंच्या मानसिक स्वास्थ्यावर लक्ष देणे) लक्ष देण्याचा प्रयत्न केला. आम्ही करारातून बाहेर असलेल्या व अंडर-१९ खेळाडूंची यादी तयार केली. आम्ही त्यांना जाणकारांची मदत घेण्याची संधी प्रदान केली.’
द्रविडने पुढे सांगितले, ‘माजी क्रिकेटपटू असल्यामुळे माझ्या मते माजी क्रिकेटपटू व क्रिकेट प्रशिक्षकांकडे सध्या युवा खेळाडू ज्या कालखंडातून मार्गक्रमण करीत आहेत, अशा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी स्पेशालिटी नाही. त्यामुळे आम्ही त्यासाठी व्यावसायिकांची मदत घेतली.’ क्रिकेटमध्ये मानसिक स्वास्थ्याचा मुद्दा असल्याचे कबूल करीत द्रविड म्हणाला, ‘सध्या यावर अधिक चर्चा होत असल्यामुळे आनंद झाला. (वृत्तसंस्था)