ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टिन लँगर यांनी सध्याच्या मालिकेत खेळाडू जखमी होण्यामागे आयपीएलला दोषी ठरविले आहे. यंदाच्या आयपीएल आयोजनाची वेळ चुकीची होती, असा आरोप करीत खेळाडूंना होणाऱ्या जखमा ‘आयपीएलची भेट’असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाला मालिकेत खेळाडूंच्या दुखापतीचे ग्रहण लागले आहे. भारताचे नऊ, तर ऑस्ट्रेलियाचे पाच खेळाडू जखमी झाल्याने सामन्याला मुकले आहेत. लँगर यांनी साधारणपणे एप्रिल-मेमध्ये होणारे आयपीएल आयोजन यंदा कोरोनामुळे यूएईत सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदविला. ते म्हणाले,‘ दोन्ही संघांतील जखमी खेळाडूंची यादी मोठी आहे. मोठ्या मालिकेआधी आयपीएलचे आयोजन होणे योग्य नव्हते.’
मोहम्मद शमी, लोकेश राहुल, उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे एकापाठोपाठ एक जखमीह होऊन बाहेर पडले. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर पहिल्या दोन कसोटींत खेळू शकला नव्हता. आपल्याला आयपीएल पसंत आहे, असे सांगून लँगर म्हणाले, ‘कौंटी खेळून कौशल्य विकसित होते, तर आयपीएलद्वारे झटपट क्रिकेटचे तंत्र सुधारता येते. यावेळी मात्र आयोजनाची वेळ चुकली. दोन्ही संघांतील इतके खेळाडू जखमी होणे हा आयपीएलचाच परिणाम म्हणावा लागेल. याची समीक्षा होईल, अशी अपेक्षा आहे.’ जडेजा आणि बुमराह खेळणार नसल्याचा किती परिणाम जाणवेल, असे विचारताच लँगर म्हणाले,‘निश्चितपणे मोठा परिणाम जाणवेल. मात्र, आता सर्वधिक फिट कोण हे तपासण्याची वेळ आली आहे.’ चौथा सामना शुक्रवारपासून सुरू होत आहे.
...तर हॅरिस घेईल पुकोव्हस्कीचे स्थान सलामीचा फलंदाजी विल पुकोव्हस्की फिट नसेल तर मार्कस् हॅरिस हा त्याचे स्थान घेईल. पुकोव्हस्कीला सिडनी कसोटीत क्षेत्ररक्षणादरम्यान जखम झाली होती. त्याच्या खांद्यावर सूज आहे. त्याच्या जखमेचे स्कॅन करण्यात आले आहे. फिट नसेल तर हॅरिसला संधी दिली जाईल,’ असे लँगर यांनी सांगितले.
स्टीव्ह स्मिथचा केला बचावफलंदाजीदरम्यान ऋषभ पंत याने खेळपट्टीवर तयार केलेले निशाण मिटविल्याबद्दल टीकेचे लक्ष्य ठरलेला स्टीव्ह स्मिथ याचा बचाव करताना लँगर यांनी हे वृत्त खोडसाळ, चुकीचे आणि मर्यादा ओलांडणारे असल्याचे संबोधले. चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणानंतर स्मिथमध्ये फार बदल झाले असून, तो असे निममबाह्य वर्तन करूच शकत नाही, अशी खात्री आहे. तो कधीही क्रिजजवळ गेला नाही. खेळपट्टी टणक असल्याने निशाण मिटविण्यासाठी जोड्याला किमान १५ इंच स्पाइक्सची गरज असावी लागते. तो केवळ फलंदाजीनेच उत्तर देतो,’ असे लँगर म्हणाले.
n खराब यष्टीरक्षण आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध शेरेबाजी केल्याप्रकरणी जाहीर माफी मागणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याच्याकडे नेतृत्व कायम असेल, असे लँगर यांनी स्पष्ट केले. तीन झेल सोडणाऱ्या पेनच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगून माझा त्याला शंभर टक्के पाठिंबा राहील, असे जाहीर केले. सार्वजनिकरीत्या माफी मागितल्यामुळे पेनच्या कर्तृत्वात भर पडल्याचे लँगर यांचे मत आहे.