पाकिस्तान क्रिकेट संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांना नवख्या अमेरिकेकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला, त्यानंतर टीम इंडियाविरुद्धची हातची मॅचही त्यांनी गमावली. त्यामुळे त्यांना Super 8 मध्ये पात्र होता आले नाही आणि त्यानंतर पाकिस्तानी संघावर चहूबाजुंनी टीका सुरू झाली आहे. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाच्या कामगिरीवर मंथन करण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ( PCB) बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानी खेळाडूंकडून आचारसंहितेच उल्लंघन झाल्याचे समोर आले. खेळाडूंनी या दौऱ्यावर कुटुंबाला सोबत नेले होतेच, शिवाय त्यांनी अनेक प्रमोशनल इव्हेंट्सना भेट दिल्याचे वृत्त समजते आहे. PCB चे चेअरमन मोहसिन नक्वी यांनी यासंदर्भात तातडीने बैठक घेतली आणि संघातील काही सीनियर अधिकाऱ्यांना झापलं.
''पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून संघ व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि भविष्यात खेळाडूंसाठी काही कठोर धोरणे लागू करण्याचा अंदाज आहे,” असे सूत्राने सांगितले. सूत्रांनी पुढे सांगितले की, खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांना आयसीसी आणि इतर मोठ्या स्पर्धांमध्ये परवानगी न देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय देखील पीसीबीच्या ऑपरेशनचा एक भाग म्हणून लवकरच जाहीर केला जाईल अशी अपेक्षा आहे. अनेक खेळाडूंनी केवळ त्यांच्या पत्नीला आणि मुलांना वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नेले नाही तर त्यांचे पालक, भाऊ इत्यादी टीम हॉटेलमध्ये राहिल्याने अध्यक्षांना दुःख झाले आहे.
खेळाडूंना त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दौऱ्यावर नेण्याची परवानगी कोणी दिली याबाबत चौकशी केली असता, या निर्णयामागे बोर्डातील काही वरिष्ठ अधिकारी असल्याचे समोर आल्याचे त्यांनी सांगितले. "यापैकी काही अधिकारी व्यावसायिक नसून खेळाडूंचे चाहते आहेत आणि त्यांना बऱ्याच सवलती दिल्या आहेत, ज्यामुळे संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेत पराभव झाला," सूत्राने सांगितले.