Asian Games 2023 : आशियाई क्रीडा २०२३ पुरुष क्रिकेट स्पर्धेतील चौथा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अतिशय रोमहर्षक झाला. बांगलादेशने निसटता विजय मिळवला अन् मलेशियाला २ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित २० षटकांत ५ बाद ११६ धावा केल्या. मलेशियाच्या संघाने कडवी झुंज दिली. पण, २ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ११७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाने २० षटकांत ४ बाद ११४ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरूवात अत्यंत वाईट झाली. तिसऱ्याच षटकांत ३ धावांवर तीन फलंदाज तंबूत परतले होते. महमुदुल हसन जॉय आणि परवेझ हसन या दोन्ही सलामीवीरांना खातेही उघडता आले नाही. तर झाकीर हसनही एक धावा काढून बाद झाला. मग कर्णधार सैफ हसनसह अफिफ हुसैनने धावसंख्या ४१ पर्यंत नेली. अफिफने १४ चेंडूत २३ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शहादत हुसेननेही २६ धावांचे योगदान दिले. सैफने कर्णधारपदाची खेळी केली आणि ५२ चेंडूत ५० धावा करत अर्धशतक झळकावून नाबाद परतला. यष्टिरक्षक झाकीर अलीनेही १४ धावांची नाबाद खेळी केली.
११७ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना मलेशियाला सुरूवातीलाच मोठे झटके बसले. सलामीवीर झुबैदी झुल्किफ्ल १ धाव करून बाद झाला. मोहम्मद आमिर आणि कर्णधार अहमद फैज यांना खातेही उघडता आले नाही आणि पाचव्या षटकातच संघाची धावसंख्या १८/३ झाली. सलामीला आलेल्या अझीझने २० धावांची खेळी केली. विरनदीप सिंग आणि विजय उन्नी यांच्यात चांगली भागीदारी झाली आणि पंधराव्या षटकात धावसंख्या ७२ पर्यंत नेली.
बांगलादेशने तोंडचा घास पळवलामग २१ चेंडूत १४ धावा करून विजय बाद झाला. मलेशियाचा कोणताच फलंदाज खेळपट्टीवर टिकत नव्हता पण विरनदीपने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. मलेशियाच्या विजयाच्या आशा शेवटच्या षटकापर्यंत कायम होत्या. शेवटच्या षटकात संघाला विजयासाठी पाच धावा करायच्या होत्या मात्र ५२ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर असताना अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर विरनदीप बाद झाला अन् मलेशियाच्या तोंडचा घास बांगलादेशने पळवला. त्यामुळे या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा पहिला सामना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार असून ६ ऑक्टोबरला थरार रंगणार आहे.