इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी करंडक स्पर्धेत न खेळून संकट ओढावून घेतलं आहे. या प्रकरणातून धडा घेताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCC) मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. भारतीय कसोटीपटूंसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ नंतर कसोटीपटूंच्या पगारात वाढ होणार आहे. याशिवाय BCCI एका मोसमातील सर्व कसोटी मालिकेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना बोनस देण्याचाही विचार करत आहे. अलीकडेच काही खेळाडूंनी ट्वेंटी-२० क्रिकेटला प्राधान्य देताना कसोटी क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आयपीएलसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी खेळाडूंनी रणजी करंडक स्पर्धेच्या सामन्यांकडे पाठ फिरवल्यानंतर BCCI नियमांत बदल करू शकतात. BCCIच्या आदेशानंतरही इशान किशनने झारखंडसाठी रणजी करंडक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या श्रेयस अय्यरनेही तेच केले. डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर इशान ब्रेकवर आहे . तो आयपीएल २०२४ मध्ये मैदानात परतणार आहे. अय्यरही कोलकाता नाइट रायडर्सकडून आयपीएलमध्येच पुनरागमन करेल.
आयपीएलनंतर कसोटी क्रिकेटच्या फी वाढीबाबत बीसीसीआय अधिकृत घोषणा करेल, अशी अपेक्षा आहे. भारतीय खेळाडूंना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी १५ लाख रुपये मॅच फी मिळते. २०१६ मध्ये त्यांचा पगार दुप्पट झाला होता. अशा परिस्थितीत आता बोर्ड कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी ही रक्कम आणखी वाढवू शकते. खेळाडूंना प्रत्येक वनडेसाठी ६ लाख रुपये आणि ट्वेंटी-२०साठी ३ लाख रुपये मॅच फी मिळते.
कर्णधार रोहित शर्माने रेड बॉल फॉर्मेट सोडलेल्या खेळाडूंना सज्जड दम भरला आहे. चौथ्या कसोटी सामन्यानंतर रोहित म्हणाला, "जे खेळाडू भुकेले आहेत, ज्या खेळाडूंना येथे राहून कामगिरी करायची आहे आणि कठीण परिस्थितीत खेळायचे आहे, त्यांना आम्ही प्राधान्य देऊ. तुम्हाला क्रिकेटची भूक असेल तर तुम्ही कसोटी क्रिकेट खेळायला हवे, नाहीतर काही अर्थ नाही.''