बारबाडोस, दि. 4 - वेस्ट इंडिजचा अष्टपैलू कायरन पोलार्डनं खिलाडू वृत्तीला काळिमा फासणारा प्रकार केला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये इवीन लेविसचे शतक होऊ नये म्हणून पोलार्डनं चक्क नो बॉल टाकला.
कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये बार्बाडोस त्रिदेण्ट्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स यांच्यातील सामन्यात पोलार्डने इवीन लेविस या फलंदाजाचे शतक होऊ नये म्हणून जाणूनबुजून नो बॉल फेकला. त्याच्या या कृतीमुळे क्रीडावर्तुळात टीका होत आहे.
साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात बार्बाडोस त्रिदेण्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 128 धावा केल्या होत्या. 129 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स संघाने धडाकेबाज फलंदाजी करताना 7 षटकांत 128 धावा केल्या. विजयासाठी दोन धावांची गरज असताना 7 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इवीन लेविसने एकेरी धाव घेऊन स्ट्राइक आपल्याकडे ठेवली.
संघाला विजयासाठी एक धाव आणि इवीन लेविसला शतकासाठी तीन धावांची गरज होती. त्यावेळी गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या बार्बाडोस त्रिदेण्ट्स संघाचा कर्णधार पोलार्डने नो बॉल टाकून इवीन लेविसचे शतक होऊ दिले नाही. इवीन लेविसने 32 चेंडूत सहा चौकार आणि 11 षटकारांच्या मदतीने 97 धावा कुटल्या.
पोलार्डच्या गोलंदाजीवर चौकार अथवा षटकार लगावत या स्पर्धेत सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम इवीन लेविसच्या नावावर होणार होता. पण पोलार्डनं नो बॉल टाकल्यामुळे इवीन लेविसच शतक हुकलं.
यापूर्वी इतिहासात असे घडले आहे
एका बाजूने सहकारी बाद होत असताना सलामीपासून किल्ला लढविणारा भारताचा अव्वल फलंदाज वीरेंद्र सेहवागचे शतक पूर्ण होऊ नये, म्हणून श्रीलंकेचा फिरकीपटू सूरज रणदीवने जाणीवपूर्वक नो बॉल टाकला. जाणीवपूर्वक यासाठी म्हणायचे, की गेल्या वर्षभरात कसोटी, वनडे किंवा टी-२० या कोणत्याही प्रकारात, तसेच या सामन्यातही त्याने नो बॉल टाकलेला नव्हता. वेगवान गोलंदाजांचे ठीक मुळात फिरकी गोलंदाजांकडून नो बॉल हा अपवादात्मक मानला जातो. त्या चेंडूमुळे मिळालेल्या एका धावेने भारत विजयी झाल्याने त्यावर सेहवागने मारलेला षटकार तांत्रिकदृष्ट्या जमेस धरता येत नसल्याचा निर्णय पंचांनी दिला. परिणामी, नाबाद ९९ धावांवर विजयी सेहवागला कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत परतावे लागले.
क्रिकेटचा नियम
क्रिकेटच्या नियमाप्रमाणे नो बॉल किंवा वाइड बॉल यांची धाव ही खेळाडूने केलेल्या धावे आधी मोजली जाते. त्यामुळे जर एखाद्या संघाला जिंकायला 1 धाव गरजेची असताना गोलंदाजाने नो बॉल टाकला आणि त्याच चेंडूवर फलंदाजाने षटकार जरी खेचला तरी ती एक धाव पकडून संघाला विजयी घोषित करण्यात येते आणि फलंदाजाने केलेल्या धावा मोजल्या जात नाहीत.
Web Title: Players should not be stigmatized - Pollard did not score a ball so as not to be a hundred
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.