Join us

खेळाडूंना 'जसे काम तसे दाम'; BCCI अ‍ॅक्शन मोडवर! क्रिकेटर्सच्या पत्नीबाबतही मोठा निर्णय

वेतन कपातीची तयारी, कामगिरीनुसार मिळणार बोनस, कुटुंबीयांसोबत अधिक वेळ राहता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 08:56 IST

Open in App

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: यापुढे राष्ट्रीय संघातील खेळाडूंना कामगिरीच्या आधारे वेतन देण्याचा विचार बीसीसीआयने सुरू केला आहे. गचाळ कामगिरी झाल्यास वेतन कपातही केली जाईल. ११ जानेवारीला झालेल्या बोर्डाच्या आढावा बैठकीत नव्या नियमावर चर्चा पार पडली. याच बैठकीत आलेला नवा पर्याय असा की, जे खेळाडू चांगली कामगिरी करतील त्यांना बोनस दिला जाईल.

मिळालेल्या वृत्तानुसार, लाल चेंडू खेळताना अधिक जबाबदारीने खेळावेत यासाठी हा विचार करण्यात आला. जेणेकरून ते संघातील आपली भूमिका अधिक जबाबदारीने पार पाडू शकतील. जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरतील, त्यांना मिळणारा पगारही कमी असेल.

रोहित शर्मा, विराट कोहली या प्रमुख खेळाडूंना 'काम तसा दाम' हा नियम लागू होणार आहे. खेळाडूंना त्यांची कामगिरी सुधारावी लागेल, अन्यथा त्यांना पूर्ण पगार दिला जाणार नाही. कॉर्पोरेट हाउसमध्ये ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीनुसार पगारवाढ दिली जाते, तसाच नियम आता भारतीय क्रिकेटमध्ये लागू होण्याची शक्यता आहे.

खेळाडूची कामगिरी समाधानकारक न झाल्यास त्याचा परिणाम त्याच्या पगारावर होईल. खेळाडूंना याची जाण असायला हवी की, त्यांनी कामगिरी न केल्यास त्यांच्या पगारात कपात होईल. त्यांना त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील,' असे सूत्रांनी सांगितले.

रोहित पाकमध्ये जाईल?

कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होण्याआधी फोटो शूटच्या निमित्ताने पाकिस्तानात जाणार आहे. स्पोर्टस तकच्या वृत्तानुसार, रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फोटोशूटसाठी व कर्णधारांच्या पत्रकार परिषदेसाठी पाकिस्तानात जावे लागणार आहे.

पत्नीला जास्त दिवस परवानगी नाही

भारतीय खेळाडू ४५ दिवसांच्या विदेश दौऱ्यावर असतील, तर त्यांची पत्नी किंवा कुटुंबीयांना दोन आठवड्यांपेक्षा अधिक वेळ खेळाडूंसोबत राहता येणार नाही. याशिवाय सर्व खेळाडूंना हॉटेल ते स्टेडियम असा प्रवास एकत्रपणे बसमधूनच करणे अनिवार्य असेल. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेली खराब कामगिरी आणि त्या आधी न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर झालेल्या दारुण कामगिरीनंतर खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला. दौऱ्यात कुटुंबीय सोबत असतील, तर खेळाडूंचे खेळावरील लक्ष विचलित होत असल्याचा निष्कर्ष बोर्डाने काढलेला आहे.

खासगी प्रशिक्षकाला बसमध्ये परवानगी नाही

  • सर्व खेळाडू टीम बसमध्येच प्रवास करतील, हे बोर्डाने वारंवार सांगणे कुठेतरी खटकणारे आहे, अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली. आधीपासूनच हा नियम असताना बोर्डाने असे का सांगावे, असे आकाशने लिहिले.
  • ऑस्ट्रेलिया दौऱ्यात राखीव 3 खेळाडूच्या पत्नीने स्वतःच्या यूट्यूब वाहिनीसाठी एक व्हिडीओ शूट केला. त्यात ड्रेसिंग रूममधील अनावश्यक दृश्य, तसेच बसने प्रवास करतानाचे दृश्य दाखविण्यात आले.
  • खेळाडूकडे १५० किलोपेक्षा अधिक वजनाचे सामना असेल तर बीसीसीआय अतिरिक्त वजनाचा भार उचलणार नाही. खेळाडूला स्वतः त्याचे पैसे मोजावे लागतील. भारताचा पुढील विदेश दौरा जूनमध्ये आहे.

कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन

गेल्या वर्षी बीसीसीआयने कसोटी खेळाडूंसाठी प्रोत्साहन भत्ता सुरू केला. त्यानुसार, २०२२-२३ पासून एका हंगामात ५० टक्क्यांहून अधिक कसोटी सामन्यामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना प्रतिसामना ३० लाख रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन मिळेल. एका हंगामात किमान ७५ टक्के सामन्यांमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी ही रक्कम प्रतिसामना ४५ लाख रुपयांपर्यंत वाढेल. कसोटी कॅपचे मूल्य कळावे, याची खात्री करण्यासाठी बोर्डाने नवा नियम लागू करण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ