पाकिस्तान क्रिकेट संघाचा हंगामी निवड समिती प्रमुख शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय ट्वेंटी-२० संगात फक्त तेच खेळाडू निवडले जातील, ज्यांचा स्ट्राइक रेट १३५ किंवा त्याहून अधिक असेल असे आफ्रिदीने म्हटले आहे. देशांतर्गत ट्वेंटी-२० स्पर्धेत ज्यांचा स्ट्राईक रेट १३५ पेक्षा कमी आहे, अशा फलंदाजांसाठी राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडणार नाहीत, असे माजी कर्णधाराने म्हटले आहे. आफ्रिदीच्या घोषणेनंतर कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान यांचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. या दोन्ही फलंदाजांचा ट्वेंटी-२० मध्ये स्ट्राइक रेट १३० पेक्षा कमी आहे.
आशिया चषक आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार बाबर आजम आणि उपकर्णधार मोहम्मद रिझवान यांच्या संथ फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. बाबरने ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये ओपनिंग करू नये, असे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंचे मत आहे. या दोघांच्या संथ खेळामुळे संघाला पॉवरप्लेचा फायदा घेता येत नाही. सुरुवातीला धावा काढता न आल्याने उर्वरित फलंदाजांवर दडपण येते, असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान बाबरने मधल्या फळीत फलंदाजी करावी, असा सल्ला खुद्द शाहिद आफ्रिदीने दिला आहे.
शान मसूद, फखर जमान किंवा मोहम्मद हरीस यांसारख्या आक्रमक फलंदाजांसाठी बाबरने सलामीची जागा सोडली पाहिजे, असेही आफ्रिदी म्हणाला होता. समा टीव्हीशी बोलताना आफ्रिदी म्हणाला की,''आम्हाला अधिकाधिक तरुणांना संघात स्थान द्यायचे आहे.'' तथापि, १३५ च्या स्ट्राइक रेटचा नियम कोणत्या खेळाडूंवर लागू होईल हे त्यांनी स्पष्ट केले नाही. सर्व खेळाडू या कक्षेत येतील की फक्त नवीन खेळाडू?
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"