कोरोना व्हायरसच्या संकटातही काही ठिकाणी हळुहळू क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांविना बुंदेसलिगा फुटबॉल सामने खेळवले जात आहेत. दोन-अडीच महिन्यानंतर जगातील क्रीडाप्रेमींना अखेर लाईव्ह स्पर्धा पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता लवकरच क्रिकेट स्पर्धाही पाहायला मिळतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. पण, त्यापूर्वी सर्व नियमांचं काटेकोर पालन होणं हेही महत्त्वाचे आहे. पण, फुटबॉल लीगप्रमाणे क्रिकेट सामनेही प्रेक्षकांविना खेळवावे लागणार आहेत. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानं अशा सामन्यांत ती मजा नसेल असं मत व्यक्त केलं.
तो म्हणाला,''रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे हे क्रिकेट मंडळासाठी व्यवहार्य आणि टिकाऊ असेल, परंतु त्यानं महसूल जमा केला जाऊ शकतो, असं मला वाटत नाही. प्रेक्षकांविना खेळणं म्हणजे वधुशिवाय विवाह करणं. क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षक हवेच. या वर्षभरात कोरोनाची परिस्थिती सुधरेल, अशी आशा व्यक्त करतो.''
सचिन तेंडुलकरचं शतक हुकल्याचं दुःख2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या भारताविरुद्धच्या सामन्यातील आठवणींना उजाळा देताना अख्तरनं सचिन तेंडुलकरचं शतक हुकल्याचं दुःख वाटल्याचं मत व्यक्त केलं. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 273 धावा केल्या. पाकिस्तानचा सलामीवीर सईद अन्वरनं शतकी खेळी केली. प्रत्युत्तरात सचिननं 98 धावा करताना भारताला 6 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
अख्तर म्हणाला,''2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत आमच्याविरुद्ध सचिन तेंडुलकर 98वर बाद झाला, याचं मला दुःख वाटलं होतं. ती स्पेशल खेळी होती आणि त्याचं शतक व्हायला हवं होतं. त्यानं शतक करावं असं मला मनापासून वाटत होतं. पण, मी टाकलेल्या बाऊंसरवर तो बाद झाला, त्या बाऊंसरवर षटकार गेलेला मला आवडला असतं.''