Join us  

दुसऱ्या टेस्टसाठी संघ निवडताना विराटची लागणार 'कसोटी'

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अंतिम सामन्यातील पराभव पचवून भारतीय संघाने वेस्ट इंडिजबरोबरची मालिका जिंकली आणि पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला.

By namdeo.kumbhar | Published: August 02, 2017 5:58 AM

Open in App
ठळक मुद्देविंडिजचा पराभव केल्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं पहिल्याच कसोटीत ऐतिहासिक विजय नोंदवला. नियमीत सलामीवीर दुखपतीमुळे खेळू न शकल्यामुळे पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि मुकुंदला संधी मिळाली. या दोघांनीही या संधीचं सोनं करत आपली निवड योग्य ठरवली होती. भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ मजबुत आहे त्यामुळे बऱ्याचदा भारतीय संघाच्या कर्णधाराला संघातील 11 खेळाडूंची निवड करणे डोकेदुखी ठरते.

मुंबई, दि. 2 - चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अंतिम सामन्यातील पराभव पचवून भारतीय संघाने वेस्ट इंडिजबरोबरची मालिका जिंकली आणि पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला. विंडिजचा पराभव केल्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं पहिल्याच कसोटीत ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात विराटसेनेनं सांघिक कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेला आपली जागा दाखवली. पहिल्या कसोटी सामन्यात ताप आल्यामुळे के.एल. राहुल खेळू शकला नव्हता. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दुखापतीमुळे तो संघाच्या बाहेर गेला होता. पण काल झालेल्या सराव सत्रात त्याने सहभाग नोंदवत विराटच्या अडचणी वाढवल्या आहेत. 

पहिल्या कसोटी सामन्यात राहुलच्या जागी संधी मिळालेल्या अभिनव मुकुंदनं दुसऱ्या डावात 81 धावा केल्या होत्या. तर भारताच्या दुसऱ्या सलामीवीर शिखर धवननं पहिल्या डावामध्ये 190 धावांची खेळी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला उद्या 3 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. पण या सामन्याआधी कॅप्टन विराट कोहलीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

मुकुंद आणि धवननं पहिल्या टेस्टमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे राहुलला संधी द्यायची असेल तर कोणाला काढायचं हा प्रश्न विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीला सतावणार आहे. तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  

भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ मजबुत आहे त्यामुळे बऱ्याचदा भारतीय संघाच्या कर्णधाराला संघातील 11 खेळाडूंची निवड करणे डोकेदुखी ठरते. बऱ्याचदा आपण पाहिले असेल की संघाचा कर्णधार हा सलामी जोडीच्या खराब कामगीरीमुळे चिंतेत असतो, पण भारतीय कर्णधार विराट कोहलीसमोर चांगल्या खेळीमुळे डोकेदुखी होत आहे. जखमी असल्यामुळे मुरली विजयने या मालिकेतून माघार घेतली असली तरी त्याने आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. त्या जागी आलेल्या शिखरनेही आपली गब्बर खेळी करत कर्णधारापुढे कोडे निर्माण केलं आहे. 

के. एल. राहुल, मुरली विजय, अभिनव मुकुंद आणि शिखर धवन या चार कसोटी सलामीवीरांना आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीद्वारे संघात स्थान निर्माण केलं आहे. विजय सध्या संघाबाहेर असला तरी अंतिम संघ निवडताना नक्की कोणाला खेळवायचे हा मोठा प्रश्न विराटसमोर असेल. अंतिम संघात सलामीच्या जोडीची निवड करणे फारच कठीण असल्याचे खुद्द विराटनेही काल झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल केलं. नियमीत सलामीवीर दुखपतीमुळे खेळू न शकल्यामुळे पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि मुकुंदला संधी मिळाली. या दोघांनीही या संधीचं सोनं करत आपली निवड योग्य ठरवली होती. आता के एल राहुल तंदुरुस्त झाला असून, तो दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे नक्की कोणाला अंतिम संघात स्थान द्यावे, याविषयी कोहलीची समस्या वाढली आहे.

सलामी जोडी व्यतिरीक्त भारताची मधली फळीही भक्कम आहे. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे आणि वृद्धिमान साहा यांच्यामुळे भारताची मधली फळीही भक्कम झाली आहे. हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा आणि आर अश्विन या अष्टपैलू त्रिकुटामुळे भारताची फलंदाजी अधिक खोलवर आणि धोकादाक झाली आहे. गोलंदाजीचा विचार केला तर शमी आणि यादव यांचा वेगवान आणि स्विंग मारा समोरच्या फलंदाजासाठी डोकेदुखी ठरत आहे. भारताच्या बेंच स्ट्रेंथचा विचार केला तर रोहित शर्मा, लोकेश राहुल, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव अशी तगडी नावं दिसतील. 

या वर्षाखेरीस चार महिन्यात भारतीय संघ २३ आंतराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यामध्ये टी २०, वनडे आणि कसोटीचा समावेश असेल. विराट कोहलीनं भविष्यातील भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम लक्षात ठेवून बेंच स्ट्रेंथचा वापर करावा. मोठ्या सत्रात खेळाडूंना दुखपत होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोहलीनं सर्व खेळाडूंचा योग्यवेळी वापर करावा.

सध्या भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या विभागात समतोल आहे, तर या उलट श्रीलंका संघाला अनेक बाबतीत चिंता करण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षांत भारतीय संघाची कामगिरी (विशेषत: मायदेशात) उल्लेखनीय ठरली आहे. अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारताने सुरुवातीला वेस्ट इंडीज आणि त्यानंतर मायदेशात चमकदार कामगिरी केली. अशा स्थितीत या दौ-यात भारतीय संघाला ख-या अर्थाने आव्हान मिळण्याची शक्यता नाही.