दुबई : संपूर्ण भारत आशा लावून बसलेल्या रविवारच्या सामन्यात न्यूझीलँडने अफगाणिस्तानवर विजय मिळवत भारताला स्पर्धेबाहेर केले. त्यामुळे नामिबियाविरुद्ध आज होणारा सामना खेळणे ही भारतीय संघासाठी आता केवळ औपचारिकता राहिली आहे. आजच्या सामन्यातील निकालाला स्पर्धेच्या दृष्टीने काहीही महत्त्व न उरल्याने भारत या सामन्यात आपल्या बाकावरच्या खेळाडूंना संधी देऊ शकतो. नामिबियाविरुद्धच्या आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल अपेक्षित आहे.
आतापर्यंत विश्वचषकात संधी न मिळालेला राहुल चहर पुन्हा मैदानावर खेळताना दिसू शकतो. तसेच फलंदाजीत इशान किशनला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या दोन सामन्यांत भारतीय संघाने त्यांच्या योग्यतेची प्रचिती दिली होती. तीच लय आजच्या सामन्यात राखण्याचा संघाचा प्रयत्न असेल. आजच्या सामन्यात सलामीच्या जोडीतही बदल दिसू शकतो. तसेच हार्दिक पांड्याच्या जागी या सामन्यात नवा खेळाडू दिसू शकतो. दुसरीकडे नामिबियाला या स्पर्धेत गमावण्यासारखे काहीही नव्हते. त्यामुळे या स्पर्धेत ते निर्धास्त होऊन खेळले.
स्कॉटलंडविरुद्धचा एक विजय सोडला तर नामिबियाच्या हाती फारसे काही लागले नाही. तरी सुद्धा आजच्या सामन्यासह या स्पर्धेतून घेतलेला अनुभव नामिबियाला भविष्यात निश्चितच उपयोगी पडणार आहे. या सामन्यात काही नव्या खेळाडूंसह नामिबिया मैदानात उतरू शकते. भारतासारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्याला कडवे आव्हान देण्याचा नामिबियाचा प्रयत्नही करेल. मात्र, यासाठी त्यांना पूर्ण क्षमतेने प्रत्येक विभागात उत्तम खेळ करणे क्रमप्राप्त आहे. आजचा सामना ही औपचारिकता असली तरी दोन्ही संघ आपल्या सन्मानासाठी हा सामना जिंकण्याचा निश्चितच प्रयत्न करतील.
कर्णधार विराटचा शेवटचा टी-२० सामना
कर्णधार म्हणून विराटचा हा शेवटचा टी-२० सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून आपल्या कर्णधारपदाची विजयी सांगता करण्याचा विराटचा प्रयत्न असेल. भावनिकदृष्ट्याही विराटसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण, विराटचे लाडक्या शास्त्री गुरुजी या सामन्यानंतर भारतीय संघाचा निरोप घेणार आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान जरी संपुष्टात आले असले तरी एक कर्णधार म्हणून या सामन्यावर छाप पाडण्याचा कोहली जरूर प्रयत्न करेल.
संघ पुढीलप्रमाणे
भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, शार्दुल ठाकुर
नामिबिया: गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), स्टीफन बार्ड, कार्ल बिरकेनस्टॉक, मिचौ डु प्रीज, जॉन फ्रिलिंक, ज़ेन ग्रीन, निकोल लोफी-ईटन, बर्नार्ड शोल्ट्ज, बेन शिकोंगो, जे.जे. स्मिट, रूबेन ट्रम्पलमन, माइकल वॅन लिंगेन, डेविड विसे, क्रेग विलियम्स.