अहमदाबाद - ‘भारतीय संघात दिग्गज कर्णधारांच्या नेतृत्वात खेळल्याचा फायदा मला आगामी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना होईल,’ असे मत या संघाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल याने व्यक्त केले आहे. सलामीवीर शुभमन हा विराट आणि रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघात खेळला आहे. पहिल्या दोन सत्रांत गुजरातचे नेतृत्व करणारा हार्दिक मुंबई संघात गेल्यानंतर शुभमनकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.
केकेआरकडून २०१८ला आयपीएल पदार्पण करणारा गिल म्हणाला, ‘नेतृत्वाशी अनेक गोष्टी जुळलेल्या असतात. त्यातील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे समर्पितवृत्ती, शिस्त आणि कठोर मेहनत घेण्याची तयारी. याशिवाय आपल्याकडे सोपविण्यात आलेल्या कामाप्रति प्रामाणिक असणे हे देखील महत्त्वाचे आहे.
दिग्गजांच्या नेतृत्वात खेळून त्यांच्याकडून मी बरेच काही शिकलो. या खेळाडूंच्या अनुभवातून मी जे प्राप्त केले तेच आयपीएलमध्ये माझ्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.’ त्याचप्रमाणे, ‘गुजरात संघात अनुभवी खेळाडूंची उणीव नाही. त्यामुळे कर्णधारपद भूषविताना माझ्यावर कोणतेही दडपण नसेल. न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि अफगाणिस्तानचा राशिद खान यांच्याकडून देखील अनुभव मिळणार आहे.
संघातील मोहम्मद शमी, डेव्हिड मिलर आणि रिद्धिमान साहा हे देखील माझ्या नेतृत्वक्षमतेला झळाळी आणण्यास मदत करतील, यात शंका नाही,’ असेही गिलने सांगितले.