पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यात देशाचे प्रतिनिधित्व करणारे क्रिकेटपटूच आता कोरोनाच्या जाळ्यात अडकले गेले आहेत. तौफीक उमर नंतर शाहिद आफ्रिदीला कोरोना झाल्याचे समोर आले. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या 29 पैकी 10 खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाचं गांभीर्य ओळखा, त्याला हलक्यात घेण्याची चूक करू नका, असे आवाहन माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं केलं आहे.
सोमवारी पाकिस्तान संघातील हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले होते आणि आता त्यात आणखी सात खेळाडूंची भर पडली आहे. पाकिस्तानच्या 10 खेळाडूंसह एकूण 35 ( सपोर्ट स्टाफ) सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) मंगळवारी तसे जाहीर केले. फाखर जमान, इम्रान खान, कशीफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वाहब रियाझ यांना कोरोना झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले.
पाकिस्तान क्रिकेट मंडळासाठी हा मोठा धक्का आहे. कारण, आता त्यांचा इंग्लंड दौरा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानचा संघ ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत इंग्लंड दौऱ्यावर तीन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. तरीही पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान दौरा अजूनही होणार आहे. पॉझिटिव्ह आढळलेले खेळाडू त्वरित सेल्फ आयसोलेशनमध्ये जाणार आहेत.
या बातमीनंतर आफ्रिदीनं ट्विट केलं की,''फाखर, इम्रान खान, कशीफ, हाफिज, हसनैन, रिझवान, वाहब आणि मलंग यांची प्रकृती लवकरात लवकर सुधरावी, यासाठी प्रार्थना करतो. सर्वांना काळजी घ्या. या व्हायरला गांभीर्यानं घ्या, असं आवाहन मी पाकिस्तानी जनतेला करतो.'' आफ्रिदीलाही कोरोना झाला असून तो सध्या उपचार घेत आहे. त्याची प्रकृती बिघडल्याच्या अफवाही पसरल्या होत्या, परंतु त्यात तथ्य नसल्याचे क्रिकेटपटूनं स्वतः स्पष्ट केलं.