Join us  

PM Modi Cabinet : गुजरातचे मनसुख मांडविया देशाचे नवे क्रीडा मंत्री; कोण आहेत ते? जाणून घ्या

नरेंद्र मोदींनी ९ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 10:28 PM

Open in App

PM Modi Cabinet Ministry : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीएने मिळवलेल्या यशानंतर नरेंद्र मोदींनी ९ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे मोदी ३.० मध्ये कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवारी खातेवाटप झाले असून, आता मनसुख मांडविया यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ५२ वर्षीय मांडविया हे यापूर्वी २०२१ पासून मागील मोदी सरकारमध्ये आरोग्य मंत्रालय सांभाळत होते. अनुराग ठाकूर यांच्या जागी क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारणारे मनसुख हे गुजरातमधून येतात. (PM Modi Cabinet) 

गुजरातमधील सर्वात तरूण आमदार म्हणून त्यांनी ओळख मिळवली. मनसुख यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते आणि २००२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत ते सर्वात तरुण आमदार बनले. मनसुख मांडविया यांनी पालितानामधून विजय मिळवून आमदार होण्याचा मान पटकावला. ते अनेक वर्षे गुजरातमध्ये राज्य सचिव राहिले आणि अखेर २०१२ मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून गेले. त्यांनी भावनगर विद्यापीठातून सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

दरम्यान, मागील दोन लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पूर्ण बहुमत मिळवले होते. मात्र, यावेळी २०१४ आणि २०१९ सारखी परिस्थिती नाही. भाजपला यावेळी मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागले. बहुमत न मिळाल्याने भाजपने JDU आणि TDP सह इतर अनेक छोट्या पक्षांसोबत सरकार स्थापन केले आहे. देशाचे नवनिर्वाचित क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांसमोर पहिले आव्हान पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चे असेल. येत्या २६ जुलैपासून ऑलिम्पिकच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. पॅरिस ऑलिम्पिकची तयारी पूर्ण झाली असली तरी त्यानंतर मनसुख मांडविया भारतातील खेळांबाबत कोणते मोठे निर्णय घेतात हे पाहण्याजोगे असेल. 

टॅग्स :नरेंद्र मोदीसरकारअनुराग ठाकुरगुजरात