PM Modi Letter to Chris Gayle Jonty Rhodes: दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने बुधवारी भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक पत्र शेअर केलं. आपल्या ट्वीटरवर त्याने हे पत्र पोस्ट केलं. PM मोदींनी ऱ्होड्सला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, जॉन्टी ऱ्होड्सची भारताबद्दल असलेली आपुलकीचे कौतुक करत त्याला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मजबूत संबंधांसाठीचा 'विशेष राजदूत' असं सबोधत त्याचा सन्मान केला.
जॉन्टी ऱ्होड्सने हे पत्र आपल्या ट्वीटरवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “धन्यवाद नरेंद्र मोदीजी. मी तुमचा मनापासून आभारी आहे. मी जेव्हा जेव्हा भारतात आलो त्या त्या वेळी माझी वैयक्तिक स्तरावर नेहमीच प्रगती होत राहिली. लोकांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या राज्यघटनेचा महत्त्वाचा सन्मान म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवशी माझं संपूर्ण कुटुंब भारतीय लोकांसारखंच प्रजासत्ताक दिन साजरा करतं", असं ट्वीट करत त्याने पंतप्रधान मोदी यांना नम्र शब्दात उत्तर दिलं.
विंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल यालाही पंतप्रधान मोदींनी वैयक्तिक पत्र लिहीले. त्याने या संदर्भात ट्वीट केले असून भारतातील लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
"मी भारताच्या संपूर्ण जनतेला ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राने माझी आजची सकाळ खूपच उत्साहवर्धक झाली. माझे भारतीयांशी आणि भारताशी असलेले चांगले संबंध लक्षात घेता त्यांनी मला विशेष संदेश पाठवला. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. सर्वांना 'युनिव्हर्स बॉस'कडून शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम", असं ट्वीट करत त्यानेही आपल्या भावना व्यक्त केल्या.