Pm Modi Letter to Mithali Raj: भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने ८ जून २०२२ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. २३ वर्षांच्या समृद्ध क्रिकेट कारकिर्दीत तिने १० हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या. महिला क्रिकेटमध्ये हा एक मोठा विक्रम आहे. मितालीची क्रिकेट कारकीर्द ही अनेक युवा तरूणींसाठी प्रेरणास्थान आहे. त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पत्राद्वारे मिताली राजसाठी खास पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत.
मिताली राजने तिच्या ट्विटर हँडलवरून एक पत्र शेअर करत स्वत: पंतप्रधान मोदींचे आभार मानले. 'आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एवढं प्रेम, प्रोत्साहन मिळणं ही सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदी हे माझ्यासह लाखो लोकांसाठी आदर्श आणि प्रेरणा आहेत. त्याच्या प्रोत्साहनपर शब्दांनी मी भारावून गेलो आहे', असे मितालीने ट्वीट केले.
पीएम मोदींनी पत्रात लिहिले आहे की, काही आठवड्यांपूर्वी तुम्ही क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन लाखो चाहत्यांना नाराज केले. ज्या करोडो लोकांसाठी तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व केलेत, त्यासाठी मी शुभेच्छा देतो. तुम्ही करोडो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहात. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकात कोविड-19 च्या प्रतिकूल परिस्थितीत लोकांना मदत केल्याबद्दल तुमचे कौतुक वाटते. याशिवाय इतर अनेक सामाजिक कार्यातही तुम्ही सहभाग घेतला आहे याचा आम्हाला अभिमान आहे.
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांची नोंद करणाऱ्या मिताली राज हिने वयाच्या ३९ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. या संदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मितालीने लिहिले होते की, मी अगदी लहान मुलगी होते तेव्हा मी निळी जर्सी परिधान करून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. हा प्रवास खूप मोठा होता. या काळात विविध प्रकारचे क्षण मला अनुभवायला, पाहायला मिळाले. गेली २३ वर्षे माझ्या जीवनातील सर्वात उत्तम क्षणांपैकी एक होती. प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही आता थांबवत आहे. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा करत आहे.