अबूधाबी : संयम आणि आक्रमकतेचा अचूक ताळमेळ साधत युवा शुभमान गिलने आयपीएलमध्ये पाचव्यांदा अर्धशतक झळकावले. या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या गुणांचे खाते उघडताना सनरायझर्स हैदराबादचा ७ गड्यांनी पराभव केला. शुभमानने ६२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या.
हैदराबादने दिलेल्या १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने १८ षटकांमध्येच विजयी लक्ष्य पार केले. सुनील नरेन शून्यावर बाद झाल्यानंतर शुभमान आणि नितिश राणा (२६) यांनी संघाला सावरले. शुभमानने आपली क्षमता दाखवताना जबाबदारीपूर्वक फलंदाजी केली. त्यामुळेच कर्णधार दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाल्यानंतरही केकेआरच्या धावगतीवर फारसा फरक पडला नाही. ठराविक अंतराने ३ फलंदाज बाद झाल्यानंतर शुभमान व इयॉन मॉर्गन (नाबाद ४२) यांनी नाबाद ९२ धावांची भागिदारी करत कोलकाताला विजयी केले. त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या रचण्याची हैदराबादची रणनीती चुकली. सलामीवीर अपयशी ठरल्यानंतर मनीष पांड्ये आणि रिद्धिमान साहा यांची ६२ धावांची भागिदारी महत्त्वाची ठरली. मनीष पांड्येने ३८ चेंडूंत ५१ धावा केल्या. त्याला साहाने ३१ चेंडूंत ३० धावा करत चांगली साथ दिली. मुंबई इंडियन्सविरुद्ध अत्यंत महागडा ठरलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने भेदक मारा केला. त्याने सुरुवातीपासून टिच्चून मारा करत जॉनी बेयरस्टॉचा बळीही मिळवला. फिरकीपटू वरुण चक्रवर्थी यानेही अचूक मारा करत धोकादायक डेव्हिड वॉर्नरला तंबूची वाट दाखवली. दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या कोलकाताच्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा करत हैदराबादला फटकेबाजीपासून दूर रोखले.
Web Title: Points account opened by Kolkata Knight Riders
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.