नवी दिल्ली : भारतीय संघातील जलदगती गोलंदाज दीपक चहरच्या आग्रा येथील राहत्या घरी चोरांनी चोरीचा प्रयत्न केला. चहरच्या राहत्या घरात आई एकटी असते आणि त्यांच्या हुशारीमुळे चोरांचा प्रयत्न फसला. चहरच्या आईने योग्यवेळी अलार्म दाबल्याने चोरांना चांगलीच अद्दल घडली. शाहगंज पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. या सहा जणांनी या परिसरात अनेक चोरी केल्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेरीस चहरच्या आईच्या हुशारीमुळे या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत चहरने भारतीय संघात पदार्पण केले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक जिंकला. चहरने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून उल्लेखनीय कामगिरी केली होती आणि त्याच जोरावर त्याला भारतीय संघात संधी मिळाली. आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध त्याने चार षटकांत 37 धावा देत एक विकेट घेतली होती.
रुपकिशोर, राजकुमार, विजय खुशवाह, दश्रथ, दिनदयाल आणि राकेश अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघांनी चहरच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुरुवातीला CCTV कॅमेराची वायर कापली. त्यानंतर चहरच्या आईला संथय आला आणि त्यांनी त्वरीत अलार्म वाजवला.